आता सोशल नेटवर्किं गचा वापर सामान्य झाला आहे. परंतु यासोबतच त्याच्या वापराचे फायदे व तोेटे यांची चर्चाही रंगू लागली आहे. बॉलिवूड किंवा सेलिब्रेटींचा विचार केल्यास आपल्या चाहत्यांशी थेट संवाद साधण्याचे माध्यम त्यांना मिळाले . मात्र त्याचे विपरित परिणामही दिसू लागले आहेत. विशेषत: बॉलिवूडमधील नायिकांनी केलेल्या पोस्टवरून त्यांना वारंवार टार्गेट केले जात असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील काही शहरात ‘मांस बंदी’वर रणकंदण माजले असतानाच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने या विषयावर पोस्ट टाकल्याने तिला टीकेचा सामना करावा लागला आहे. काही टीकाकारांनी तर तिच्यासाठी अपमानजनक शब्दांचा वापरही केला आहे. असे पहिल्यांदाच घडत आहे, असेही नाही. काही दिवसांपूर्वी सिनेमा व टीव्ही अभिनेत्री श्रृती सेठ हिने मोदी सरकारच्या एका निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर उत्तर देताना टीकाकारांनी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. याशिवाय नेहा धुपिया, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट व दीपिका पदुकोण यांनादेखील अशाच त्रासदायक स्थितीचा सामना करावा लागला आहे. या अभिनेत्रींनी आपले मत प्रगट करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यावर टीका झाली. हे करताना त्याच्या विषयी आपत्तीजनक शब्दही वापरण्यात आले. एक ा अभिनेत्रीने खाजगीत आपले मत प्रगट केले. ती म्हणाली, असे वाटायला लागले आहे की आपण लोकशाही असलेल्या देशात राहत नाहीत, आपले बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. सरकारच्या एखाद्या निर्णयाविषयी आपले मत प्रकट केल्यास आमच्या चारित्र्यावर ताशेरे ओढले जातात, अपमानजनक भाषा वापरली जाते. यामुळे आम्हाला लाज वाटवी अशी परिस्थिती निर्माण होते. या अभिनेत्रीने ट्विटरवर पोस्ट करणे देखील कमी केले आहे. यामागचे कारण सांगताना ती म्हणाली, मला माझे मत प्रगट करण्यापेक्षा माझ्या कुटुंबाचा सन्मान जास्त महत्त्वाचा आहे. अशा टीकांना जास्त गंभीरतेने घेण्याची काहीच गरज नाही असे मानणारा एक वर्गही आहे. एक चित्रपट समीक्षक याविषयावर म्हणाले, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सर्वांनाच आहे, जर तुम्ही काही लिहाल तर त्यावर प्रतिक्रिया येतीलच. कधी कधी अशा प्रतिक्रिया मर्यादा पार करतात. मात्र ती पोस्ट हटविण्याशिवाय त्याचा इलाज नाही. काही दिवसांनी लोक सर्व विसरून जातात. सोशल नेटवर्किंग दुधारी तलवारीसारखी आहे. ती स्वातंत्र्याचा अनुभव तर देतेच पण, या स्वातंत्र्यासाठी किंमत मोजावी लागते.
- anuj.alankar@lokmat.com