ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जून अक्कीनेनी यांच्या मुलाचं लग्न तुटल्याचं वृत्त आहे. उद्योगपती जी. व्ही .के. रेड्डी यांची नात श्रिया भूपलसोबत त्याचं लग्न ठरलं होतं, गेल्यावर्षी दोघांचा साखरपुडाही झाला होता. लग्न तुटण्याचं नेमकं कारण अजून सांगण्यात आलेलं नाही. यावर्षी इटलीमध्ये मे महिन्यात दोघांचं लग्न होणार होतं. या लग्नसमारंभात जवळपास 700 पाहुणे सहभागी होणार होते.
यानंतर नागार्जून हे घराच्या बाहेर अजून पडलेले नाहीत याशिवाय त्यांनी दिग्दर्शकांना दिलेल्या तारखाही पुढे ढकलल्या असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. मुलाचं लग्न तुटल्यामुळे व्यथित झाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असं बोललं जात आहे.मुलगा अखिलच्या खासगी आयुष्यात होत असलेल्या घडामोडींमुळे ते व्यथित झाले आहेत, मुलाच्या चित्रपटातील कारकिर्दीलाही स्थिरता आलेली नसल्यामुळे ते चिंतेत आहेत असंही म्हटलं जात आहे.
तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ओम नमो वेंकटेशाय या सिनेमाला कमी प्रतिसाद मिळण्याचं यामागे कारण असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मुलाचं लग्न तुटल्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचललं असल्याची दाट शक्यता आहे.