Join us  

गांधी-शास्त्री जयंतीला अक्षयच्या 'स्काय फोर्स' ची घोषणा; भारताच्या एअर स्ट्राईकची अनटोल्ड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 12:51 PM

'स्काय फोर्स' हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारबद्दल सर्वांना ठाऊक आहे की, तो एका वर्षात अनेक चित्रपट करतो. रोमँटिक, अ‍ॅक्शन आणि विनोदी चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकणार्‍या अक्षयचे 2023 मध्ये आतापर्यंत 2 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यातच अक्षय कुमारने गांधी-शास्त्री जयंतीच्या दिवशी आणखी एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'स्काय फोर्स' हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने त्याच्या 'स्काय फोर्स' चित्रपटाचा टीझरही शेअर केलाय. 

अक्षय कुमारने 'स्काय फोर्स' चित्रपटाचा टीझर सोशल मीडिया हँडलवर शेअर केलाय. अक्षय कुमारने कॅप्शन लिहिले आहे की, "आज गांधी-शास्त्री जयंतीच्या दिवशी संपूर्ण देश जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय संशोधन याचा जागर होतोय. #Skyforce ची घोषणा करण्यासाठी आजच्यापेक्षा चांगला दिवस नाही. भारताच्या पहिल्या आणि सर्वात प्राणघातक हवाई हल्ल्याची ही अनटोल्ड स्टोरी. स्काय फोर्स चित्रपट 2 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होईल". 

टीझरची सुरुवात ही पाकिस्तानच्या एका धमकीने सुरू होते. त्यानंतर लाल बहादूर शास्त्रींची एक क्लिप पाहायला मिळते. चित्रपटाची ही कथा भारताच्या पहिल्या आणि सर्वात प्राणघातक हवाई हल्ल्यावर आधारित आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटात अक्षय कुमार एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

'स्काय फोर्स' चित्रपटात अक्षयसोबत सारा अली खान, निमृत कौर, वीर पहाडिया यांच्याही भूमिका असणार आहेत. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ही अभिषेक कपूर आणि संदीप केवलानी यांनी सांभाळली. तर दिनेश विजन, ज्योती देशमुख आणि अमर कौशिक हे त्याचे निर्माते आहेत.

अक्षय कुमारच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर,  'स्काय फोर्स' या चित्रपटाव्यतिरिक्त अक्षय कुमार 'मिशन रानीगंज', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'वेलकम 3', 'हेरा फेरी 3', 'हाऊसफुल 5', 'सूराराई पोत्रू' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारचा नुकताच 'OMG 2' चित्रपटात पाहायला मिळाला होता. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडहवाईदलएअर इंडिया