Join us

हिट अँड रनच्या निकालापर्यंत सल्लूचे नवीन प्रॉजेक्ट वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2015 13:04 IST

हिट अँड रनप्रकरणात स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करणा-या अभिनेता सलमान खानने आता या खटल्याचा निकाल लागेपर्यंत नवीन चित्रपटांसाठी करार करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ - हिट अँड रनप्रकरणात स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करणा-या अभिनेता सलमान खानने आता या खटल्याचा निकाल लागेपर्यंत नवीन चित्रपटांसाठी करार करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. ६ मे रोजी या खटल्याचा निकाल लागणार असून यानंतर सल्लू पुढील सिनेमांविषयी निर्णय घेणार आहे.

बॉलीवूडमधील दबंग अभिनेता सलमान खान सध्या बजरंगी भाईजान व सुरज बडजात्यांच्या प्रेम रतन धन पायो या दोन सिनेमांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटांचे चित्रीकरण आता अंतिम टप्प्यात आले असून आणखी तीन चित्रपटांमध्ये सलमान खान काम करणार असल्याचे समजते. मात्र हिट अँड रन प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सलमानने नवीन सिनेमा करण्यास नकार दिला आहे. जम्मू काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपी पक्षाच्या शिष्टमंडळाने सलमान खानची भेट घेऊन जम्मू काश्मीरमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडरपद स्वीकारण्याची विनंती केली होती. सलमानने ही ऑफर नाकारली असली तरी हिट अँड रन प्रकरणामुळे सलमान सध्या नवीन काम स्वीकारत नसल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगली आहे.