Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ - स्पृहा गारठले पावसात

By admin | Updated: July 20, 2016 23:40 IST

बेधुंद बरसणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये स्वत:ला ओले चिंब करून घेत पावसात भिजण्याची मजाच काही और असते.

बेधुंद बरसणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये स्वत:ला ओले चिंब करून घेत पावसात भिजण्याची मजाच काही और असते. सिनेमांमध्ये तर अनेकदा आपण पावसात गाण्यांच्या तालावर थिरकणारे हिरो-हिरॉईन पाहतोच; परंतु, पडद्यावर दिसणाऱ्या त्या खोट्या खोट्या पावसात या हिरो-हिरॉईनला स्वत:च्या आनंदासाठी नाही, तर केवळ त्या सीन्ससाठी नाईलाजास्तव भिजावे लागते. आता पाहा ना, लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंड या आगामी चित्रपटातील हॅन्डसम हंक सिद्धार्थ चांदेकर अन् स्पृहा जोशी या दोघांनाही असाच काहीसा पावसातील मजेशीर अनुभव या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आला. हा फनी इन्सिडन्स सिद्धार्थने सीएनएक्ससोबत शेअर करताना सांगितले, की आम्हाला पावसातील दोन वेगवेगळे सीन्स एकाच दिवशी शूट करायचे होते, म्हणून आम्ही रेन मशिन मागवले होते; परंतु काही तांत्रिक कारणास्तव ते मशिन येऊ शकले नाही. मग काय करायचं हा प्रश्न सर्वांसमोरच पडला अन् आमच्या युनिटने परमिशन घेऊन एक पाण्याचा टँकर मागविला. एवढेच नाही तर छोटे-छोटे शॉवर, पाइप्स या सर्व गोष्टी सेटवर आल्या. त्यानंतर मला अन् स्पृहाला भिजविण्यात आले. या सर्व गोष्टींसाठी संध्याकाळ झाली. खूप थंडी वाजत होती अन् अशा अवस्थेत आम्ही दोघे पार भिजून गारठलो होतो. ते पाणी पण एवढे गार होते, की अक्षरश: आम्ही दोघेही कुडकुडतच होतो. पण जेव्हा तुम्ही हे सीन्स पाहाल तेव्हा ते खरंच एकदम सुंदर अन् नॅचरल वाटतील. नक्कीच पावसातील हे रोमँटिक सीन्स पाहण्यासाठी सिद्धार्थचे चाहते लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंड या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतील, यात मात्र काही शंकाच नाही.