सिद्धार्थ जाधव हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या सिद्धार्थने मोठ्या मेहनतीच्या आणि टॅलेंटच्या जोरावर सिनेसृष्टीत नाव कमावलं. सिद्धार्थ एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच फॅमिली मॅनदेखील आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने कुटुंबाबद्दल भाष्य करताना पत्नीचं कौतुक केलं.
सिद्धार्थने अजब गजब या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत स्वरा आणि ईरा या मुली आणि पत्नी तृप्ती यांच्याबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "माझं आणि स्वरा, ईराचं नातं डेंजर आहे. त्या दोघीही कमाल आहेत. आणि त्या दोघी जेव्हा माझ्याकडे हट्ट करतात तेव्हा मला खूप मस्त वाटतं. स्वरा तर आता मोठी झालीय. पण, ईरा अजूनही लहान आहे. दोघींना माझं काम आणि माझी एनर्जी आवडते. त्यांना मी सांगितलंय की मी तुमचा लहान भाऊ आहे. त्यामुळे त्या मला राबवून घेतात. मुलीचा बाप होणं मजा असते. म्हणून त्यांना जे काही करायचंय त्याच्यासाठी आत्मविश्वास देतो. तृप्तीदेखील त्यांना छान सांभाळते. तृप्ती एक हुशार मुलगी आहे. त्यांचा अभ्यास ती बरोबर घेते".
सिद्धार्थची पत्नी तृप्ती एक बिजनेसवुमन आहे. तिचं कौतुक करताना सिद्धार्थ म्हणाला, "आम्ही दोघं एकत्र असल्यापासून तिला हे करायचं होतं. ती बिजनेस माइंडेड आहे. ती कमाल आहे. ज्या पद्धतीने तिने स्वत:चं प्रस्थ तयार केलं आहे. मग सलून असेल किंवा साड्यांचा ब्रँड असेल, अलिबागला बंगला असेल...मला माहीत होतं की ते करणार. फक्त प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. तोपर्यंत तुम्ही ती एनर्जी घ्या. तुम्ही उभं राहण्यासाठी प्रयत्न करा. आज ती ज्या पद्धतीने सगळं हँडल करतेय. ती स्वत: सलूनमध्ये जाऊन उभी राहते. जेवढं बाप होणं कठीण आहे तेवढंच आई होणंही कठीण आहे".