Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टीने नवऱ्याबाबत व्यक्त केली ही खंत, म्हणाली - 'राज सर्वगुण संपन्न आहे, पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 16:21 IST

शिल्पा शेट्टी सध्या सुपर डान्सर ४ शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते.

छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो सुपर डान्सर ४च्या आगामी भागात गायक कुमार सानूचे स्वागत करण्यात येणार आहे आणि त्याच्या गाण्यांचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. नव्वदच्या दशकातील त्याच्या गाजलेल्या गाण्यांवर स्पर्धक डान्स सादर करतील. कुमार सानू देखील आपली काही लोकप्रिय गाणी गुणगुणताना दिसेल आणि सर्वांना आठवणीच्या काळात घेऊन जाईल. हा वीकेंड डान्स, संगीत, मस्ती आणि रंजक किस्से ऐकायला मिळणार आहे. 

या भागात एक विश बाउलची गंमत असणार आहे, ज्यात शो मधील प्रत्येकाला आपल्या इच्छा पूर्ण झालेल्या दिसतील. टीव्हीवरची एक अत्यंत चंचल आणि चुणचुणीत परीक्षक शिल्पा शेट्टीने कुमार सानूकडे एक खास मागणी केली. या गाण्याची विनंती करताना तिने आपला पती राज कुंद्रा याच्याबद्दल एक गंमतीशीर किस्सा सांगितला. तिने कुमार सानूला ‘कभी हाँ कभी ना’ चित्रपटातील ‘वो तो है अलबेला’ गाणे म्हणण्याची विनंती केली, जे राज कुंद्राचे एक अत्यंत आवडते गाणे आहे.

तिने सांगितले, “राज अगदी सर्वगुणसंपन्न आहे, पण त्याला गाता येत नाही. माझ्या नवर्‍याने हे गाणे म्हणायला सुरुवात केली आणि मी हे पुरते ओळखले की, गाणे म्हणणे त्याचे काम नाही. त्यामुळे, मला आशा आहे की, हे गाणे खरे कसे म्हणायला हवे हे तो आज ऐकेल.”

कुमार सानू म्हणाला, “एका रियालिटी शोमध्ये मी ही गाणी पहिल्यांदाच म्हणत आहे.” आपल्या जबरदस्त आवाजाने त्याने सगळ्यांना भारून टाकले आणि शिल्पाची इच्छाही पूर्ण केली. हे गाणे म्हणून झाल्यानंतर कुमार सानू म्हणाला, “मी राज कुंद्राला कधीच भेटलेलो नाही. पण मी त्याला हेच सांगीन की, तो कितीही चांगला किंवा वाईट गायक असला तरी त्याला जेव्हा गरज असेल तेव्हा त्याला मदत करण्यास मी तत्पर आहे.”

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रासुपर डान्सरकुमार सानू