Join us  

'या' एका कारणामुळे शर्मिष्ठाने ललित प्रभाकरला दिली तिची पहिली कमाई; म्हणाली, '500 जणांच्या घोळक्यात..'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 1:20 PM

Sharmishtha raut: सुरुवातीच्या काळात शर्मिष्ठाने ज्युनिअर आर्टिस्टमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. आज ती उत्तम अभिनेत्री आणि निर्मातीदेखील आहे.

शर्मिष्ठा राऊत (sharmishtha raut) हे नाव मराठी प्रेक्षक वर्गासाठी नवीन नाही. उत्तम अभिनेत्री असण्यासोबत ती यशस्वी निर्मातीदेखील आहे. त्यामुळे मराठी कलाविश्वात तिची कायम चर्चा असते. आजवरच्या कारकिर्दीत शर्मिष्ठाने अनेक गाजलेल्या मालिका, रिअॅलिटी शो, सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच तिचा नाच गं घुमा हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या निमित्ताने तिने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या पहिल्या कमाईवर भाष्य केलं आहे. शर्मिष्ठाने तिची पहिली कमाई चक्क अभिनेता ललित प्रभाकरला (lalit prabhakar) दिली होती.

अलिकडेच शर्मिष्ठाने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ललित प्रभाकर आणि तिची पहिली कमाई याविषयी भाष्य केलं. "मी सुरुवातीला ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केलं. तेव्हा ५०० जणांच्या घोळक्यात मला २५० रुपये मिळाले होते. गेली कित्येक वर्ष मी ते पाकीट जपून ठेवलं होतं. पण, गेल्या दीड एक वर्षापासून ते माझ्याकडे नाहीये. मी ते पाकिट ललित प्रभाकरला दिलं आहे", असं शर्मिष्ठा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "ललितने आनंदी गोपाळ हा सिनेमा केला होता. त्यात त्याचं काम पाहून मी भारावून गेले होते. मी त्याला म्हटलं होतं की, तू यापेक्षा काहीतरी भारी काम करशील. पण, आता तू जे काही केलंय ते खूप जास्त भारी आहे. तुझी मोठी बहीण म्हणून मला तुला एक बक्षीस द्यायचंय. तेव्हा मी त्याला हे पाकिट दिलं. ही माझी पहिली कमाई आहे ज्युनिअर आर्टिस्ट असं लिहिलं होतं त्या पाकिटावर. ज्यावेळी मी त्याला हे पाकिट दिलं त्यावेळी मला खात्री होती की नक्कीच तो हे जपून ठेवेल." दरम्यान, शर्मिष्ठा आणि ललित या दोघांनी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेत शर्मिष्ठाने ललितच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे ही मालिका संपल्यानंतरही या जोडीने त्यांचं बहीण-भावाचं नात जपलं. आजही ते रक्षाबंधन, भाऊबीज हे सण, उत्सव एकत्र साजरे करतात.

टॅग्स :सेलिब्रिटीललित प्रभाकरसिनेमाटेलिव्हिजनमराठी अभिनेता