ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.14 - एस.एस. राजामौली यांच्या बाहुबली-2 या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निरनिराळ्या कारणांसाठी चर्चेत असलेल्या या सिनेमामध्ये बॉलिवूड किंग शाहरूख खानची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आलं आहे.
शाहरूख खान या चित्रपटात स्पेशल अपिअरन्स देणार असल्याची चांगलीच चर्चा आहे. अर्थात शाहरूख किंवा राजामौली यांच्याकडून या वृत्ताला अजून दुजोरा देण्यात आलेला नाही. दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल आणि सुरिया हे बाहुबली-2मध्ये कॅमिओ रोल प्ले करणार असल्याच्या अफवा काही दिवसांपूर्वी पसरल्या होत्या. त्यानंतर आता शाहरूख खान बाहुबली-2 मध्ये कॅमिओ प्ले करणार असल्याची चर्चा आहे.
'बाहुबली' या सिनेमाने भारतीय सिनेजगतात सर्व रेकॉर्ड मोडत कमाईचा नवा इतिहास रचला होता. तर प्रदर्शनाआधीच सॅटेलाइट्स राइट्सच्या माध्यमातून बाहुबली-2 ने 500 कोटी रूपये कमावले आहेत. बॉलीवूडचा दिग्दर्शक करण जोहर हा सिनेमा हिंदीत प्रदर्शित करणार असून यासाठी करणच्या धर्मा प्रोडक्शनने याचे अधिकार 120 कोटींना विकत घेतले आहेत. 28 एप्रिलला हा सिनेमा 4 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
प्रभाष, राणा डग्गुबती स्टारर 'बाहुबली-2' बाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेला प्रश्न 'कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा?' याचं उत्तरही मिळणार आहे.