Join us

शाहरुख-आलिया 'कॉफी विथ करण -5'चे पहिले गेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 10:20 IST

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि क्युट आलिया भट्ट करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण' सीझन-5 मध्ये आपला आगामी बहुचर्चित सिनेमा 'डिअर जिंदगी'चे प्रमोशन करताना दिसणार आहेत.

लोकमत ऑनलाइन 

मुंबई, दि. 29 - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि क्युट आलिया भट्ट करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण' सीझन-5 मध्ये आपला आगामी बहुचर्चित सिनेमा 'डिअर जिंदगी'चे प्रमोशन करताना दिसणार आहेत. कॉफी विथ करण सीझन -5 चे पहिले गेस्ट शाहरुख आणि आलिया असणार आहेत. शोचे शुटिंग झाल्यानंतर शाहरुखने ट्विटरवर 'कॉफी...'सेटवरील फोटो शेअर केला आहे. 
 
या फोटोमध्ये शाहरुखसोबत आलिया आणि करण जोहरदेखील दिसत आहेत.  'काही दिवस केवळ प्रेम आणि समृद्धीचे असतात. खूप सारं प्रेम देण्यासाठी 'कॉफी...' टीमचे धन्यवाद', असे म्हणत शाहरुखने करणला शोसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'कॉफी विथ करण जोहर सीझन-5' 6 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 
'इंग्लिश विंग्लिश' या गाजलेल्या सिनेमाचे दिग्दर्शन करणा-या गौरी शिंदेनंच या सिनेमाची कहाणी लिहिली आहे, तसेच दिग्दर्शनही केले आहे. त्यामुळे सिनेरसिकांमध्ये 'डिअर जिंदगी' बाबतची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. तर करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे.  
 
जेव्हापासून या सिनेमाचे शुटिंग सुरू झाले आहे तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे. शाहरुख आणि आलियाची सिनेमामध्ये नेमकी कशी पद्धतीची भूमिका असेल?, मोठ्या पडद्यावर हे दोघे रोमान्स करताना दिसणार आहेत का?, हे आणि असे अनेक प्रश्न सध्या सिनेरसिकांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला 25 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार, कारण 25 नोव्हेंबरला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.