Join us
Daily Top 2Weekly Top 5

असा पुरस्कार मिळवणारा शाहरुख चौथा कलाकार

By admin | Updated: February 26, 2017 18:27 IST

अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि रेखा नंतर ह्या पुरस्काराचा मानकरी ठरणारा शाहरुख चौथा बॉलिवूड कलाकार झाला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 26 - अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि रेखा नंतर ह्या पुरस्काराचा मानकरी ठरणारा शाहरुख चौथा बॉलिवूड कलाकार झाला आहे. काल रात्री, शाहरुख खानला सदाबहार रेखांच्या हस्ते नॅशनल यश चोप्रा मेमोरियल अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आहे. सिनेसृष्टीतील असामान्य योगादानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.शाहरुख खानला जगभरातील अनेक मानसन्मान मिळालेले आहेत. त्याच्या अभिनयासाठी, सामाजिक कार्यासाठी, सिनेसृष्टीतील योगदानासाठी मोठ-मोठ्या पुरस्कारांनी त्याला नावाजण्यात आलेले आहे. परंतु काल मिळालेला हा सन्मान त्याला भावनिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा वाटत आहे. शाहरुख आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मिळून अनेक चित्रपटांची निर्मिती केली. यश चोप्रा यांच्यासोबत शाहरुख खानचे भावनिक नातं जोडलं होतं म्हणून तर जेव्हा यश चोप्रा यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दिला जाणारा नॅशनल यश चोप्रा मेमोरियल अवॉर्ड त्याला प्रदान करण्यात आला तेव्हा भावनिक होऊन शाहरुख म्हणाला की, आजचा हा सन्मान माझ्या सर्वात महत्त्वाचा आहे. यशजींनी माझे संपूर्ण करिअर घडविले. माझ्या यशाचे श्रेय त्यांना जाते.पुरस्कार स्वीकारताना किंग खान म्हणाला की, आजची सायंकाळ माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय सायंकाळ आहे. मी खूप भावनिक आहे. यश चोप्रांनी एकहाती माझे करिअर उभे केले. त्यामुळे मला घडविलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दिला जाणार पुरस्कार मला दिला जात असल्यामुळे एका अर्थाने नियतिचे चक्र पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. सोहळ्यापूर्वी माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, यशजींसोबतच्या माझ्या नात्यामुळे मला हा अवॉर्ड मिळत आहे. त्याचे श्रेय मी घेऊ शकत नाही. एवढ्या वर्षांपासून चोप्रा कुटुंबियांनी मला जे प्रेम दिले आहे ते पाहून मी स्वत:ला खरोखरंच खूप भाग्यवान समजतो. बहुधा हेच कारण आहे की, मला आज हा पुरस्कार दिला जात आहे. ही भावना फार वैयक्तिक आहे. मी ती शब्दांत व्यक्त नाही करू शकत. वीस वर्षे आम्ही सोबत काम केले. मी जेव्हा सुरूवात केला तेव्हापासून ते खंबीरपणे माझ्यापाठीशी उभे राहिले. एवढ्या दीर्घ प्रवासानंतर त्यांना गमावण्याचे दु:ख मला पचवणे खूप अवघड आहे.यश चोप्रा यांच्या यांनी दिग्दर्शित केलेल्या शेवटच्या चित्रपटात शाहरुख खानने मुख्य कलाकार म्हणून भूमिका केली होती. जब तक है जान हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे. यशजींच्या डर, दिल तो पागल है, वीर-झारा या सिनेमांतही शाहरुख खानने काम केलेले आहे.