मुंबई - बॉलिवूड बादशहा आणि सुपरस्टार शाहरुख खानचे जगभरात चाहते आहेत. अगदी वयोवृद्धांपासून ते तरुणींपर्यंत शाहरुखचे जबरा फॅन आहेत. म्हणूनच शाहरुखच्या सोशल मीडियावरही चाहत्यांकडून सातत्याने कमेंट केल्या जातात. तर त्याच्या वाढदिनी मन्नतबाहेर चाहत्यांचा मेळाच जमतो. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते दिवसरात्र बसून असतात. तर, शाहरुखही आपल्या चाहत्यांवर प्रेम करतो. त्यात प्रेमातून शाहरुखने एका ६० वर्षीय चाहत्याची इच्छा पूर्ण केलीय.
पश्चिम बंगालमधील शिवानी चक्रवर्ती ह्या शाहरुखच्या जबरा फॅन आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या कॅन्सरने पीडित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, आपण आयुष्यात एकदा तरी शाहरुखला भेटावं अशी त्यांची इच्छा. शाहरुख बद्दलची त्यांची दिवानगी आजही तशीच आहे. शाहरुख खानचे सर्वच चित्रपट शिवानी यांनी पाहिली आहेत. मग ते सुपरहीट असो किंवा फ्लॉप. म्हणूनच, नुकताच आलेला पठाण हा चित्रपटही त्यांनी सिनेमागृहात जाऊन पाहिला.
शिवानी यांच्या बेडरुमध्ये शाहरुखच्या सन २००० पासून आलेल्या आत्तापर्यंतच्या सर्वच चित्रपटांचे पोस्टर्स लागले आहेत. याच पोस्टर्सजवळ बसून त्यांनी फोटो काढत शाहरुखच्या भेटीची इच्छा व्यक्त केली. अखेरचा श्वास घेण्यापूर्वी एकदा भेटायची इच्छा व्यक्त केली. मग, शाहरुखने या जबरा फॅनला प्रतिसाद दिला. मात्र, व्हर्च्युअल पद्धतीने शाहरुखने ही भेट घेतली.
शाहरुख खानच्या फॅन पेजवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, शाहरुख आणि शिवानी यांच्यातील व्हिडिओ कॉलचा फोटो दिसून येतो. शाहरुखने शिवानी यांच्याशी खूपवेळ गप्पागोष्टी केल्या, तब्बल ४० मिनिटे दोघांमध्ये संवाद झाल्याचं शिवानी यांच्या मुलीने आज तक मीडियाशी बोलताना सांगितले. शाहरुखने त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली. तसेच, शाहरुख खानने कॅन्सर पीडित शिवानी यांना आर्थिक मदत करण्याचं वचनही दिलं आहे. तर, शिवानी यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेणार असल्याचंही सांगण्यात येतंय.