Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' चाहत्याच्या मृत्यूबद्दल शाहरूखने व्यक्त केला शोक

By admin | Updated: January 24, 2017 11:20 IST

'रईस' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वडोदरा स्थानकात चेंगराचेंगरीत जीव गमवाव्या लागलेल्या व्यक्तीबद्दल शाहरूखने शोक व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - 'रईस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत ट्रेनमधून प्रवास करणा-या शाहरूखला पाहण्यासाठी वडोदरा स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबद्दल शाहरूखने शोक व्यक्त केला असून आपण मृत व्यक्तीच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे त्याने म्हटले आहे. हजरत निजामुद्दीन स्थानकात पोहोचल्यावर त्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 
('रईस' शाहरूखला पाहण्यासाठी उडाली झुंबड, एकाचा मृत्यू)
 
रईस चित्रपटाच्या प्रमोशसाठी मुंबई ते दिल्ली प्रवास ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसने करणार असल्याचे ट्विट शाहरूखने केले, त्यामुळे आपल्या लाडक्या कलाकाराला पाहण्यासाठी स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मुंबईतही त्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर पोहोचले होते. वडोदरा रेल्वे स्थानकातही चाहत्यांची झुंबड उडाली होती, त्यामध्ये समाजवादी पार्टीचे  माजी नगरसेवक फरीद खानही उपस्थित होते. गाडी वडोदरा स्थानकात पोहोचताच शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी चाहते उतावीळ झाले आणि त्यांनी रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केला. या सर्वांमुळे स्थानकात एकच गोंधळ माजला. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमारही केला, त्यामुळे एकच धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरीही झाली. या गर्दीत फरीद खान यांनाही धक्काबुक्की होऊन ते जमिनीवर कोसळले. गर्दीतून वाट काढणे अशक्य झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच या चेंगराचेंगरीत पोलिसांसह अन्य ४ जण जखमी झाले आहेत.