Join us

स्क्रीनवरून स्टेजवर...

By admin | Updated: May 12, 2016 01:52 IST

रंगभूमीवर काम केल्यानंतर मोठ्या पडद्यावर अथवा छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांची संख्या मराठी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.

रंगभूमीवर काम केल्यानंतर मोठ्या पडद्यावर अथवा छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांची संख्या मराठी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. पण गेल्या दीड वर्षात छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर नाटकात काम करणारे कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. मालिका संपल्यानंतर कलाकार नाटकाच्या आॅफर्स स्वीकारत आहेत अथवा मालिका करीत असतानाच रंगभूमीसाठी वेगळा वेळ देत आहेत. हा जणू नवा ट्रेंडच सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. शशांक केतकर शशांक केतकर सध्या ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक करीत आहे. या नाटकाचे ३०० प्रयोग लवकरच होणार आहेत. रंगभूमीच्या त्याच्या प्रवासाविषयी तो सांगतो, ‘‘रंगभूमी हे माझे नेहमीच पहिले प्रेम राहिले आहे. अभिनेते नसिरुद्दीन शहांचे एक वाक्य मला प्रचंड आवडते की, छोट्या पडद्यावर तुम्ही आहात, त्यापेक्षा छोटे दिसता तर मोठ्या पडद्यावर मोठे दिसता. पण रंगभूमीवर तुम्ही आहात तसे दिसता. त्यामुळे रंगभूमीशी सगळ््यांचे एक वेगळे भावनिक नाते असते. छोट्या पडद्यावर तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळते. पण रंगभूमी तुम्हाला खऱ्या अर्थाने एक कलाकार म्हणून घडवते. आज छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर नाटकात काम करणारे अनेक कलाकार आहेत. मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असतानाही मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढून महिनाभरात जवळजवळ १५-१८ नाटकांचे प्रयोग करणे ही खरंतर अशक्य गोष्ट आहे. पण ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका करीत असतानाच मी नाटक करीत होतो. हा एक वेगळा ट्रेंड मी मराठी इंडस्ट्रीत आणला आहे. छोट्या पडद्यावरचे कलाकार नाटकांमध्ये काम करायला लागल्यानंतर हे कलाकार आपली लोकप्रियता नाटकांसाठी वापरत आहेत, असे काही ज्येष्ठ कलाकारांचे मत होते. पण नाटक करणारी मंडळीही मालिकांमध्ये काम करतात. त्यामुळे आम्ही नाटकात काम केले तर त्यात काय गैर आहे आणि त्यात एखाद्या कलाकारामुळे नाटकाला गर्दी होत असेल तर हे रंगभूमीसाठी चांगलेच आहे. आज नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये वावरणारे अनेक दिग्गज कलाकार आपल्याकडे आहेत, हे समजून घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे नाटक करताना एक कलाकार म्हणून तुमची जबाबदारी ही अधिक असते.’’ प्राजक्ता माळी प्राजक्ता ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेनंतर ‘प्लेझंट सरप्राइझ’ या नाटकामध्ये काम करणार आहे. नाटकात काम करण्याची तिची इच्छा काहीच दिवसांत पूर्ण होणार आहे. ती याविषयी सांगते, ‘‘मी पुण्यातील ललित कला केंद्रमधून शिक्षण घेतले आहे. तिथे रंगभूमी हा विषय आम्हाला शिकवला जायचा. पण कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेण्याची आम्हाला महाविद्यालयाकडून परवानगी नव्हती. तेव्हापासूनच मला नाटकात काम करण्याची इच्छा होती. पण अभिनय क्षेत्रात आल्यानंतर मी चित्रपट आणि मालिकेत काम केले. नाटकात काम करण्याची संधी मिळाली नाही. मालिका संपल्यानंतर नाटक करायचे मनाशी पक्के ठरवले होते. त्यामुळे मी मालिकांच्या आॅफर्स स्वीकारल्या नाहीत. नाटक करताना तुम्ही महाराष्ट्रभर प्रवास करता, यामुळे तुम्हाला प्रेक्षकांना भेटण्याची संधी मिळते. नाटक करताना त्यांचे हावभाव आपल्याला कळतात. आपल्या अभिनयातील चांगल्या गोष्टी, त्रुटी कळतात. या गोष्टी मालिका करीत असताना शक्य होत नाहीत. सुयश टिळक अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता सुयश टिळक यांची जोडी ‘का रे दुरावा’ या मालिकेत झळकली होती. हे दोघे सध्या ‘स्ट्रॉबेरी’ या नाटकात काम करीत आहेत. मालिकेतनंतर नाटकात काम करण्याविषयी सुयश म्हणाला, ‘‘एक कलाकार म्हणून मला तिन्ही माध्यमांत काम करायला आवडते. पण नाटकात काम करताना आपण पुन्हा शाळेत गेलो आहोत असेच वाटते. कारण नाटक करताना प्रचंड अभ्यास करावा लागतो. रंगभूमीवर कलाकाराला खूप काही शिकता येते. त्यामुळे रंगभूमी ही प्रत्येक कलाकाराच्या कारकिर्दीमध्ये खूप महत्त्वाची असते. तसेच यामुळे प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळत असतात.’’चिन्मय उदगीरकर चिन्मय सध्या ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेसोबतच ‘कुछ मीठा हो जाए’ हे नाटक करीत आहे. मालिकेचे चित्रीकरण सांभाळून नाटक करणे खूपच अवघड असल्याचे तो सांगतो. रंगभूमीवर असलेल्या प्रेमामुळेच तो वेळात वेळ काढून नाटकाचे प्रयोग करीत आहे. तो याविषयी सांगतो, ‘‘माझी नाटकात काम करण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. कलाकार म्हणून रंगभूमीचा मोह कधीच टाळता येत नाही. मालिका करीत असताना नाटकाच्या तालमीसाठी, प्रयोगांसाठी वेळ कसा काढायचा हा सगळ््यात मोठा प्रश्न होता. पण मी रात्री नऊ ते एक अशी रोज तालीम करीत असे आणि सध्या चित्रीकरण सांभाळून नाटकाचे प्रयोगही करीत आहे. रंगभूमीमुळे कलाकाराच्या कलागुणांना अधिक वाव मिळतो, असे मला वाटत असल्यानेच मालिका सुरू असताना मी नाटक करण्याचा विचार केला.