Join us

सातासमुद्रापार सेटल!

By admin | Updated: September 18, 2016 01:32 IST

आपल्या जोडीदारासह परदेशात स्थायिक होणाऱ्या बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत.

आपल्या जोडीदारासह परदेशात स्थायिक होणाऱ्या बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. यात मराठी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्रीसुद्धा मागे नाहीत. मराठमोळ्या अभिनेत्रीसुद्धा आता लग्न करून, तेथेच स्थायिक होऊ लागल्या आहेत.यात सगळ्यात पहिलं नाव येतं मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांचं. मराठी आणि हिंदी सिनेमात अश्विनी भावे यांनी विविधरंगी भूमिका आपल्या अभिनयाने गाजविल्या. त्यानंतर अश्विनी भावे यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर अश्विनी भावे पतीसह अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को इथं स्थायिक झाल्या. लग्न झाल्यापासून अश्विनी भावे यांनी सिनेमात काम करणं कमी केलं होतं. तरी २००७ला त्यांनी निर्माती म्हणून नवी इनिंग सुरूकेली. अश्विनी भावे यांच्याप्रमाणेच आणखी एक मराठमोळी मुलगी परदेशी व्यक्तीवर लट्टू झाली आणि त्यानंतर परदेशात स्थायिक झाली. मूळची पुण्याची असलेली राधिका आपटे २०१२ला ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरसह रेशीमगाठीत अडकली. २०११ साली दोघांची लंडनमध्ये एका कार्यक्रमात भेट झाली. भेटीचं रूपांतर आधी मैत्रीत आणि त्यानंतर वर्षभर दोघंही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. लग्नानंतर राधिका आता लंडनमध्येच स्थायिक झालीय. याच यादीत आता आणखी एका मराठमोळ्या नावाची भर पडतेय. प्रसिद्ध मॉडेल, फेमिना मिस इंडिया, मिस अर्थ २००६ विजेती आणि अभिनेत्री अमृता पत्कीसुद्धा आता परदेशात स्थायिक होणार आहे. अमृता आता सिंगापूरमध्ये स्थायिक होणार आहे. मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेसुद्धा लग्नानंतर काही काळ परदेशात स्थायिक झाली होती. डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्नबंधनात अडकल्यानंतर, कुटुंब आणि संसारावर लक्ष देण्यासाठी धकधक गर्ल माधुरीने परदेशात पतीसह राहण्याचा निर्णय घेतला होता; मात्र सिनेमाशी असलेल्या अतूट नात्यामुळे माधुरी फार काळ स्वत:ला बॉलीवूडपासून दूर ठेवू शकली नाही. त्यामुळे माधुरी पुन्हा स्वदेशी परतली.