Join us

"माझा सिनेमा अन् माझी माणसं का आली नाही?", संतोष जुवेकरने अंकुश चौधरीचे मानले आभार

By ऋचा वझे | Updated: March 2, 2025 15:39 IST

काहीसं एकटं पडल्या सारखं वाटत होतं... संतोष जुवेकर असं का म्हणाला?

बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणारा सध्याचा सिनेमा म्हटलं की विकी कौशलच्या 'छावा'चं नाव येतं. सिनेमाने ४०० कोटी पार कमाई केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून विकीने आपली छाप पाडली आहे. लक्ष्मण उतेकरांनी अप्रतिम दिग्दर्शन केलं आहे. एकूणच सिनेमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या भव्यदिव्य सिनेमात आपला मराठमोळा संतोष जुवेकरही (Santosh Juvekar) झळकला. त्याने रायाजी मालगे ही भूमिका साकारली. संतोषचा हा सिनेमा पाहण्यासाठी नुकतंच अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) गेला होता. संतोषने अंकुशचा व्हिडिओ शेअर करत त्याचे आभार मानले आहेत.

अंकुश चौधरीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत 'छावा'च्या विशेष स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. या शोला ज्येष्ठ नागरिक, मध्यमवयीन, तरूण, विद्यार्थी अशा सर्वच वयोगटातील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अंकुशचा व्हिडिओ शेअर करत संतोष जुवेकरने लिहिले, "मला सतत वाटत होतं साला माझा सिनेमा आलाय आणि माझी माणसं मला मिठी मारून उचलून घ्यायला कशी आणि का नाही आली....काहीसं एकटं पडल्या सारखं वाटत होतं. पण एकच छावा आमचा मराठीचा आमचा Anky दादा आला आणि दादानी थेट एन्ट्री केली ती माझ्या काळजात.... त्याने कडेवरही घेतलं प्रेमाचे कपाळावर मुकेही दिले आणि मग डोक्यावर घेऊन नाचलाही ( मी नव्हतो तिकडे पण माझे सहचर माझे मावळे मित्र होते त्यांना जे दादाने प्रेम दिलंय तेच मलाही मिळालं)

Boyyyyy I love u आणि खूप खूप आदर असच कायम सोबत राहुयात रे दाद्या!!!अंकुश चौधरी ह्या आपल्या सुपरस्टारने माझा छावा अगदी आग्रहाने  त्याच्या जवळच्या सगळ्यांना दाखवला आणि सगळ्यांना थेटरात हाताला धरून घेऊन गेला . मनाचा राजा माणूस...जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे."

अंकुश आणि संतोष दोघंही जुने मित्र आहेत. यापूर्वी काही मराठी सिनेमांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. आपल्या मित्राचा हिंदी सिनेमा आहे म्हटल्यावर अंकुशने मोठ्या उत्साहात हे स्क्रीनिंग ठेवलं. संतोषनेही त्याच उत्साहात त्याचे आभार मानलेत. 

टॅग्स :संतोष जुवेकरमराठी अभिनेता'छावा' चित्रपटअंकुश चौधरीसोशल मीडिया