संस्कृती बालगुडे (sanskruti balgude) ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. संस्कृतीने 'पिंजरा' मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर संस्कृती मालिका आणि वेबसीरिजमध्ये सक्रीय झाली. त्यामुळे संस्कृती मराठी मालिका विश्वात तितकी दिसली नाही. संस्कृतीच्या आगामी 'करेज' या इंग्रजी सिनेमाचा नुकताच वॉर्नर ब्रदर्स स्टुडियोमध्ये प्रीमियर झाला. त्यानिमित्त लोकमत फिल्मीशी संवाद साधताना संस्कृती बालगुडेने मराठी मालिकाविश्वात इतकी का दिसत नाही, याविषयी खुलासा केला.मराठी मालिकेत इतकी का दिसत नाही या विषयावर संस्कृती बालगुडे म्हणाली की, "पिंजरानंतर मी एक मालिका केली तिचं नाव होतं विवाहबंधन. त्यानंतर मी एक-दोन असे एपिसोड इतर मालिकांमध्ये केले होते. गुलमोहर मालिकेत मी एक भाग केला होता, त्यानंतर अस्मिता मालिकेत मी एक भाग केला होता. टेलिव्हिजनचा आणि माझा संबंध तुटलेला नाही. कारण बऱ्याच पुरस्कार सोहळ्यांमध्ये, इव्हेंट्समध्ये मी परफॉर्म करायला असते. काही वर्षांपूर्वी मी एक रिअॅलिटी शो होस्ट केला होता."
"मालिकांमध्ये खूप कमिटमेंट द्यावी लागते. त्यामुळे तितकी कमिटमेंट देण्याची माझी इतक्यात तयारी नाही. सुदैवाने मालिकेनंतर अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. त्यामुळे प्रत्येकवर्षी काही ना काही घडत असतं. दरवर्षी एक किंवा दोन चित्रपटांचं शूटिंग चालू असतं. त्यामुळे मालिकेला वेळ देणं शक्य झालं नाही. सध्या माझ्या डोक्यात एखादी मालिका करावी असं नाहीये. कारण मी चित्रपटांमध्ये खूप रमले आहे."