Join us

Exclusive: "..अन् माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आलं"; संस्कृती बालगुडेचा सिनेमा जागतिक स्तरावर गाजला, प्रेक्षकांनी दिलं स्टॅण्डिंग ओव्हेशन

By देवेंद्र जाधव | Updated: March 25, 2025 16:59 IST

मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेचं सध्या जागतिक स्तरावर नाव गाजतंय. काय आहे यामागील कारण? जाणून घ्या (sanskruti balgude)

>>देवेंद्र जाधव

'पिंजरा' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.मराठी मालिका, सिनेमे गाजवून संस्कृती आता 'करेज' (courage) या इंग्रजी सिनेमात दिसणार आहे. विशेष म्हणजे अलीकडेच 'वॉर्नर ब्रदर्स' या आंतरराष्ट्रीय स्टुडियोमध्ये या सिनेमाचा प्रिमियर झाला. या प्रतिष्ठेच्या स्टुडियोमध्ये सिनेमाचा प्रिमियर होणारी संस्कृती (sanskruti balgude) ही पहिली मराठी अभिनेत्री आहे. त्यानिमित्ताने सिनेमाची कथा, भूमिका आणि परदेशी आलेल्या अनुभवाबद्दल संस्कृतीने लोकमत फिल्मीशी बातचीत केली.

मराठी सिनेमा गाजवल्यानंतर 'करेज' या इंग्रजी सिनेमाची ऑफर कशी मिळाली?

'करेज' या चित्रपटात मी आधी वेगळी भूमिका साकारणार होते. सिनेमाचं कास्टिंग फार मोठ्या पातळीवर असणार होतं. बॉलिवूडमधील कलाकार प्रमुख भूमिका साकारणार होते. सुरुवातीला मी या सिनेमात खूप छोटी भूमिका करणार होते. पण सिनेमातल्या प्रमुख पात्रांची ऑडिशन घेणं, बाकी होतं. कारण इतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या तारखांचे प्रॉब्लेम होते. त्यामुळे प्रोजेक्टचं शूटिंग पुढे चाललं होतं. पुढे मी ऑफिसमध्ये जाऊन ऑडिशन दिली. तेव्हा माझी ऑडिशन बघून प्रमुख कॅरेक्टरसाठी कलाकार सापडला, असं सिनेमाचे निर्माते उदय देवस्कर यांना जाणवलं. पुढे मग प्रमुख भूमिकेसाठी माझी निवड झाली. 

वॉर्नर ब्रदर्स सारख्या आंतरराष्ट्रीय स्टूडिओमध्ये सिनेमाचा प्रीमिअर होणारी तू पहिली मराठी अभिनेत्री आहेस. तर ती भावना काय होती?

प्रामाणिकपणे सांगायचं तर खरं वाटत नव्हतं. प्रीमियरच्या दरम्यान मी खूप रडले. काही कलाकारांची इच्छा असते की हॉलिवूडमध्ये काम करावं. किंवा असं काम करावं की तिथपर्यंत पोहचावं. मला नेहमीच हॉलिवूडच्या अभिनयाची शैली खूप आकर्षक वाटलेली आहे. मी त्यांना फॉलो करत आली आहे. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. प्रत्येकाला ही गोष्ट नाही मिळत.

वॉर्नर ब्रदर्स स्टुडियोमध्ये पोहोचल्यावर स्वतःचं नाव स्क्रीनवर बघणं, सिनेमा पाहायला आलेल्या लोकांना भेटणं, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकणं, ही खूप चांगली गोष्ट होती. ही गोष्ट घडल्यावर, मी घरी आल्यावर विचार करत होते की, हे खरंच झालंय का आपल्यासोबत! कारण आपण लहानपणापासून बघत आलोय की, वॉर्नर ब्रदर्स हे हॉलिवूडमधील खूप चांगल्या दर्जाचं प्रोडक्शन आहे. ते खूप वर्षांपासून कार्यरत आहेत. मी तिथे जाणं पात्र आहे की नाही माहित नाही, पण मी खूप नशीबवान आहे की मला तिथे जाता आलं. तिथे जाऊन मला खूप भारी वाटलं. खरंच वाटत नव्हतं.

या सिनेमात तुझी भूमिका आहे?

करेज हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारीत आहे. राजराणी शर्मा यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे. माझ्या भूमिकेचं नाव राणी आहे. हा सिनेमा किडनी डोनेशन या गोष्टीवर आधारीत आहे. चित्रपट करताना आपण सिनेमॅटिक लिबर्टी घेतो, असं म्हणतो. पण या चित्रपटात कुठेही सिनेमॅटिक लिबर्टी घेतली गेली नाही, कारण त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात तशी परिस्थिती घडली आहे. अर्थात हे सिनेमाच्या माध्यमातून एका चांगल्या पद्धतीने, लोकांना आवडेल अशा पद्धतीने मांडलं गेलंय.

आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक अंकुर काकतकर असून उदय देवस्कर, सुशांत तुंगारे हे या सिनेमाचे निर्माते आहेत. सिनेमाच्या कथेचे खूप ड्राफ्ट झाले होते. स्क्रीप्टवर खूप काम केलं गेलंय. शारिब हाश्मी हा माझा सहकलाकार आहे. सत्य घटनेवर हा सिनेमा आधारीत आहे. जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचं स्क्रीनिंग झाल्यावर लोकांच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या. ही खरी घटना असल्याने लोकांचा विश्वास बसत नव्हता.  

वॉर्नर ब्रदर्स स्टूडियोत प्रीमियर झाल्यावर तिथे लोकांचा प्रतिसाद कसा होता?

प्रेक्षकांनी सिनेमा पाहिल्यावर खूप भरभरुन कौतुक केलं. फक्त माझंच नाही तर सगळ्या टीमची प्रशंसा केली. सिनेमातील माझी भूमिका स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवणारी आहे. त्यामुळे काहीकाहींना असं वाटत होतं की, हा माझा पिक्चर आहे. किंवा सिनेमात माझं काम जास्त आहे. मला नेहमीच असं वाटतं, की चित्रपट हे माध्यम हे एकाचं नाही.

याशिवाय वॉर्नर ब्रदर्स स्टूडियोमध्ये सिनेमाचा प्रिमियर झाल्यावर प्रेक्षक मला भेटले. माझ्याशी बोलले. स्टूडिओमध्ये इंडो-अमेरिकन लोक होते. याशिवाय काही प्रेक्षक संपूर्ण अमेरिकन होते. भारतात आणि अमेरिकेत सिनेमाची गोष्ट घडत असल्याने प्रेक्षकांना हा सिनेमा बघणं खूप नॉस्टॅलजिक वाटलं. लोक स्वतः येऊन माझं कौतुक करतं. सिनेमाला स्टँडिंग ओव्हेशनही मिळालं.  मला त्या क्षणाला काय वाटत होतं, हे मी आता शब्दात सांगू शकत नाही. आमच्या सिनेमाची टीम भावुक झाली होती.  कारण आम्ही कुठून सुरुवात केली होती, आणि कोणाला माहित नव्हतं की, हा सिनेमा इथपर्यंत पोहचेल. सिनेमाची कथा माणुसकीला धरुन आहे. याशिवाय काहीशी लव्हस्टोरीही आहे. सिनेमात वेगवेगळ्या छटा असल्याने लोकांना त्यांच्या आयुष्याशी अनेक गोष्टी लागू झाल्या. त्यामुळे भावनिकरित्या गुंतून लोक हा सिनेमा बघतात. हे संपूर्णतः कथेचं श्रेय आहे. 

मराठीत हिरो सिनेमाच्या नायिका निवडतात, असं तू म्हणाली होतीस. तर आता परिस्थिती बदलली आहे का?

खरं सांगू तर मला आता फारसं मला माहित नाही. मी तेव्हा जे बोलले होते तेव्हा माझ्यासोबत त्या गोष्टी घडल्या होत्या. त्यानंतर जे चित्रपट मला विचारले गेले त्यात सुदैवाने असा काही अनुभव आला नाही. तिथे व्यवस्थित लूक टेस्ट घेऊन दिग्दर्शकाने निर्णय घेतला. तो अनुभव मला आधी आला होता परंतु गेल्या वर्षात तसा अनुभव मी घेतला नाही. 

अनेक मराठी कलाकार हिंदी-साऊथ सिनेमांमध्ये काम करत आहेत. तर कलाकार म्हणून मराठीत तशा संधी मिळत नाहीयेत का?

असं असू शकेन. प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्रीला वेगवेगळ्या भूमिका करण्याची भूक असते. मला असं वाटतं की, भाषेची कोणतीही मर्यादा नाही. कलाकारांना ज्या भूमिका करायला मिळतील त्या ठिकाणी ते जातील असं मला वाटतं. कारण मराठीमध्येही अशा वेगळ्या भूमिका इतरांच्या वाट्याला येत असतात. आपण भाषेचा निकष ठेवता कामा नये.

कारण हिंदीमध्येही वेगळ्या भूमिका कलाकारांच्या वाट्याला येऊ शकतात. सुदैवाने मराठी कलाकारांच्या वाट्याला हिंदीत आणि साऊथमध्ये खरंच वेगळ्या भूमिका आल्या आहेत. प्रत्येकाची भूमिका कशी करावी याविषयी एक निवड असते. कलाकारांना त्या त्या क्षणाला जी भूमिका छान वाटते मग ती मराठीत, हिंदीत असो किंवा साऊमध्ये.. ती त्यांनी करावी.

तुझे आगामी प्रोजेक्टस कोणते?

एक सिनेमाचं मी शूटिंग थोड्या दिवसात सुरु करणार आहे. काही काही प्रोजेक्ट्स लाईन अप होत आहेत. त्याबद्दल आताच सांगू शकत नाही. पण काही काही प्रोजेक्ट्सचं शूटिंग सुरु होतंय.

टॅग्स :संस्कृती बालगुडेहॉलिवूडमराठीमराठी अभिनेतामराठी चित्रपट