Join us

संजय दत्तला कोर्टाकडून दिलासा, अटक वॉरंट रद्द

By admin | Updated: April 17, 2017 13:30 IST

बॉलिवू़डचा खलनायक अभिनेता संजय दत्तविरोधात जारी करण्यात आलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 -  बॉलिवू़डचा खलनायक अभिनेता संजय दत्तविरोधात जारी करण्यात आलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. मुंबईतील अंधेरी कोर्टानं हा निर्णय देत संजूबाबला दिलासा दिला आहे.  निर्माता शकील नुरानी यांना धमकावल्याप्रकरणी शनिवारी (15 एप्रिल) संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. दरम्यान, अटक वॉरंट रद्द व्हावं, यासाठी सोमवारी संजूबाबानं अंधेरी कोर्टात हजेरी लावली.  
 
काय आहे नेमके प्रकरण?
1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर अभिनेता संजय दत्त कोणत्या-न-कोणत्या तरी वादात सापडताना दिसत आहे. आता निर्माता शकील नुरानी धमकी प्रकरण वाद पुन्हा नव्याने समोर आले आहे.  संजय दत्तनं "जान की बाजी" सिनेमामध्ये काम करण्यासाठी 50 लाख रुपये अॅडवान्स घेतले होते. मात्र काही दिवसांनी संजयनं सिनेमाच्या पुढील शुटिंगसाठी तारखा दिल्या नाहीत, असा आरोप करत नुरानी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. 
 
याप्रकरणी नुरानी यांनी सुरुवातील "द इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन"(IMPPA)कडेही संजय दत्तविरोधात तक्रार केली होती. यावर संजय दत्तनं 15 दिवसांच्या आत नुरानी यांना 30 दिवसांच्या शुटिंगसाठी तारखा द्याव्यात किंवा 1.53 कोटी रुपयांची भरपाई करावी, असे IMPPA ने आदेश दिला होता. यानंतर संजय दत्तच्या सांगण्यावरुन कराची आणि दुबई येथून धमकीचे कॉल आल्याचा आरोपही नुरानी यांनी केला होता. दरम्यान, या खटल्यात महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून संजय दत्तला जामीन मिळाला होता. 
 
त्यामुळे IMPPA चा आदेश संजय दत्तला लागू करावा यासाठी नुरानी यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. संजय दत्तच्या पाली हिल येथील फ्लॅटवर टाच आणून रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती. मात्र मुंबई हायकोर्टाकडून संजय दत्तला दिलासा मिळाला.  IMPPAचा आदेश याठिकाणी लागू होत नाही कारण संजय त्या संस्थेचा सदस्यच नाही, असे सांगत कोर्टान नुरानी यांची मागणी फेटाळून लावली होती.