सलमान खानचा (salman khan) ईदच्या मुहुर्तावर रिलीज झालेला 'सिकंदर' सिनेमा सध्या चर्चेत आहे. 'सिकंदर' (sikandar movie) सुपरहिट होईल असं वाटत असतानाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटलेला दिसतोय. 'सिकंदर'च्या रिलीजनंतर तीन-चार दिवसांमध्येच सिनेमाची कमाई खूप कमी झाल्याचं चित्र समोर आलंय. अशातच नुकतीच एक बातमी समोर येत आहे ज्यामुळे सलमानच्या चाहत्यांना निश्चितच आनंद होईल. ही बातमी म्हणजे 'सिकंदर'नंतर सलमानच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा झाली असून या सिनेमात सलमानसोबत बॉलिवूडचा बाबा अर्थात संजय दत्त (sanjay dutt) दिसणार आहे.
सलमान - संजय दत्त एकत्र
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या रिपोर्टनुसार सलमान खान आणि संजय दत्त यांच्या आगामी सिनेमाचं नाव आहे 'गंगा राम'. ग्रामीण पार्श्वभूमी असलेली ही कहाणी अॅक्शनने परिपूर्ण असणार यात शंका नाही. या सिनेमात सलमान आणि संजय दत्त दोघेही प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. सलमान खान फिल्मस या सिनेमाची निर्मिती करणार आहे. ही बातमी कळताच दोन्ही सुपरस्टार्सच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. क्रिश अहीर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. क्रिश अहीर यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला सिनेमा आहे.
जून-जुलै २०२५ च्या दरम्यान 'गंगा राम' सिनेमाच्या शूटिंगसाठी सलमान आणि संजय दत्त एकत्र येतील. दिग्दर्शक क्रिश अहीर यांनी सलमानच्या अनेक प्रोजेक्ट्ससाठी पडद्यामागे काम केलं आहे. आता पहिल्यांदाच क्रिश दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. १९९१ साली रिलीज झालेला 'साजन' आणि २००० साली आलेला 'चल मेरे भाई' या सिनेमानंतर सलमान-संजय पुन्हा एकदा मोठ्या भूमिकेत एकमेकांसोबत दिसणार आहेत. यावर्षी शूटिंग पूर्ण झाल्यावर पुढील वर्षी २०२६ मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.