अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेला हल्ला पूर्ण देशभरात चर्चेचा मुद्दा होता. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या आरोपीने सैफवर ६ वेळा चाकूने वार केलाय यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला होता. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. त्याच्या पाठीतून २ इंचाचा चाकूचा तुकडाही काढण्यात आला. या घटनेमुळे बॉलिवूड हादरलं आणि कलाकारांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त होऊ लागली. आता नुकतंच सैफने एका मुलाखतीत त्या रात्री घडलेली सर्व घटना सांगितली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला, "करीना डिनरसाठी बाहेर गेली होती आणि मी घरीच होतो. जेव्हा ती परत आली आम्ही थोडावेळ गप्पा मारल्या आणि झोपलो. थोड्यावेळाने आमची मदतनीस घाबरतच आली आणि म्हणाली,'कोणीतरी घुसलं आहे. जेहच्या खोलीत एक माणूस घुसला आहे आणि त्याच्याकडे चाकू आहे. तो पैशांची मागणी करत आहे.' तेव्हा जवळपास २ वाजले असतील. मी जेव्हा जेहच्या खोलीत गेलो तेव्हा मला धक्काच बसला. साहजिकच मी घाबरलो. त्या माणसाच्या हातात दोन स्टिक्स होत्या ज्या मला तरी स्टिक्सच वाटल्या. तो जेहच्या बेडवर होता. नंतर कळलं की त्या स्टिक्स नाही तर हॅक्सा ब्लेड आहे. त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. तो क्षण फारच भयानक होता. माझ्या मुलाच्या जीवाला धोका पाहून मी सरळ आत गेलो आणि त्या माणसाला धरलं. तो स्वत:ला सोडवून घेण्यासाठी माझ्या पाठीवर वार करत होता. मग धडsss आवाज आला आणि ..."
सैफ पुढे म्हणाला, "मला माहितच नव्हतं की त्याच्याजवळ धारदार शस्त्र आहे. मी धक्क्यात असल्यामुळे मला कदाचित वेदनांची जाणीव झाली नाही. मग त्याने माझ्या मानेवर वार केला आणि मी त्याला तरी पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या अंगावर जखमा होत होत्या. एकदम हाणामारी सुरु होती. तो दोन्ही हातांनी वार करत होता. एका पॉइंटनंतर मात्र मी त्याला थांबवू शकलो नाही. कोणीतरी याला दूर न्या अशीच मी प्रार्थना करत होतो."
हल्ल्यानंतर तैमूर म्हणाला, 'तुम्ही आता मरणार का?'
सैफ म्हणाला, "मी अक्षरश: रक्तबंबाळ अवस्थेत होतो. करीना मुलांसह खाली गेली आणि रिक्षा किंवा कॅब शोधू लागली. मी म्हणालो मला आता वेदना जाणवत आहेत. माझ्या पाठीत काहीतरी गडबड आहे. करीना म्हणाली तू हॉस्पिटलला जा आणि मी बहिणीकडे जाते. ती सतत मदतीसाठी फोन करत होती पण कोणीच उचलत नव्हतं. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. मी म्हणालो, 'मी ठिक आहे. मी मरणार नाही.' तर बाजूला असलेल्या तैमूरने विचारलं, 'तुम्ही मरणार का?' मी म्हणालो, 'नाही'. तैमूर तेव्हा शांत होता. त्यालाही माझ्यासोबत रुग्णालयात यायचं होतं म्हणून मी इब्राहिम आणि तैमुर हरीसोबत आम्ही रिक्षाने लीलावतीला पोहोचलो."