सागर कारंडे हे कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सागरने टॅलेंट, अभिनय आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मराठी कलाविश्वात स्थान मिळवलं. विनोदाची उत्तम जाण असलेला सागर कारंडे हा कलाविश्वातील उमदा आणि हरहुन्नरी कलाकार आहे. अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत सागर कारंडे प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. 'चला हवा येऊ द्या' या शोमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.
'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये सागरने साकारलेल्या स्त्री पात्रांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. यातील स्वारगेटे बाई हे पात्र प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलं होतं. मात्र आता सागरने स्त्री पात्र करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. सागर कारंडेने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे. "यापुढे स्त्री पात्र करणार नाही", असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. सागर कारंडेने अचानक घेतलेल्या या निर्णयाने चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामागील नेमकं कारण काय आहे, ते अद्याप सागरने सांगितलेलं नाही. मात्र त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
"स्वारगेटे बाई तुम्ही सगळं बंद करा, पण हे नका बंद करू we miss you", "कोणतंही पात्र करा, भारीच असतं", "पण का? तुम्ही स्त्री पात्रात छान दिसता", "काय विनोद करता राव...तुमचे कित्येक स्त्रीपात्रांनी आम्हाला हसवलंय...", "मग शो पाहण्यात मजा नाही", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.