Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी रात्रभर रडायचे अन् सकाळी..", भूतकाळाबद्दल बोलताना वैशाली माडे झाली भावुक, म्हणाली,"त्या आठवणीही नको..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 11:48 IST

वैशालीने पहिल्यांदाच तिच्या भूतकाळाबाबत आणि आलेल्या अडचणींबाबत भाष्य केलं.

संघर्ष हा कुणालाच चुकत नसतो. मराठी कलाविश्वातील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेतलं. कोणीही गॉडफॉदर नसताना स्वत:ची जागा निर्माण केली. यातीलच एक कलाकार म्हणजे गायिका वैशाली माडे. वैशाली गेल्या १७ वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. पण तिचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.  

वैशाली ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या यंदाच्या सीझनमध्ये परिक्षक म्हणून पाहायला मिळातेय.‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर वैशालीच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी वैशालीच्या करिअरसंदर्भात, आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, तिच्या वाटेत आलेल्या अडचणी याबद्दलही वैशालीने भाष्य केलं.

वैशाली म्हणाली, आम्ही राहायचो तिथं लाइट नव्हती. घराची परिस्थितीही नव्हती की घरात आम्ही दोन रॉकेलच दिवे लावावेत. एक रॉकेलचा दिवा असायचा. आई याच रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशत स्वयंपाक करायची आणि मी तिच्या मागे रियाझाला बसायचे.  असं एकंदर घरातलं वातावरण होतं.  माझे वडील माझे पहिले गुरु होते. ते मला भजन आणि भक्तीगीत शिकवायचे. 

 भूतकाळाबद्दल बोलताना वैशाली भावूक झाली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. वैशाली म्हणाली, मी भूतकाळात रमत नाही, त्या आठवणीही नको वाटतात, त्या दिवसांत खूप काही घडलं, दु:खच जास्त होतं. जेव्हा कधी त्या दिवसांची आठवण येते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं. ते खूप अवघड दिवस होते. असेही दिवस होते की, जेव्हा मी रात्रभर रडायचे आणि पुन्हा सकाळी नव्याने जगायचं. जगणं सोपं नाहीये, पण माझ्या आवाजानं, माझ्या कलेनं मला जगवलं..'' असं वैशाली म्हणाली,    

टॅग्स :वैशाली माडे