Join us  

रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 1:54 PM

मराठी रंगभूमीवरील सर्वात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाले आहे.

सांगली - मराठी रंगभूमीवरील सर्वात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाले आहे. शनिवारी अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीने या पुरस्काराची घोषणा केली. रंगभूमिदिनी म्हणजेच ५ नोव्हेंबरला हट्टंगडी यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दरवर्षी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदकाने गौरविण्यात येते. प्रतिवर्षी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षांच्या हस्ते हे पदक प्रदान केले जाते. यंदा पाच नोव्हेंबरला नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याहस्ते हट्टंगडी यांचा सन्मान होणार आहे. 

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरही त्यांनी काम केले असून चार दिवस सासूचे, वहिनीसाहेब, सख्या रे, होणार सून मी या घरची यासह अन्य मालिकांतील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली होती. अनेक पुरस्काराने सन्मानित असलेल्या हट्टंगडी यांच्या रंगभूमीवरील कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

गौरव पदकाची गौरवशाली परंपरा

मराठी रंगभूमीवरील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जाते. आत्तापर्यंत ५३ कलाकारांना या पदकाने गौरविण्यात आले आहे. यात बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर, हिराबाई बडोदेकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, अमोल पालेकर, डॉ. जब्बार पटेल यांच्यासह अन्य दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. 

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या हट्टंगडी यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी व दूरदर्शनवरील मालिकांमधून काम केले आहे. ‘गांधी’ या चित्रपटातील कस्तुरबाच्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतातही पोहोचल्या आहेत. अक्कल धावते घोड्यापुढे, अंधेका हाथी, अमे जिवीये बेफाम, असा मी काय गुन्हा केला, ऋतुगंध, एकच प्याला, कधीतरी कुठेतरी, कस्तुरीमृग, कळी एकदा फुलली होती, खंडोबाचं लगीन यासह चाळीसहून अधिक नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे. तर अनेक मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तामीळ चित्रपटांतूनही काम केले आहे. 

टॅग्स :सांगलीनाटक