Join us  

Dunki Review: बेकायदेशीर वाटेने स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या भारतीयांची कथा, जाणून घ्या कसा आहे 'डंकी'

By संजय घावरे | Published: December 21, 2023 4:20 PM

Dunki movie review: हा चित्रपट बेकायदेशीर इमिग्रेशनवर भाष्य करत सुरेख संदेश देतो.

Release Date: December 21, 2023Language: हिंदी
Cast: शाहरूख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन ईराणी, दिया मिर्झा, सतिश शाह, विक्रम कोच्छर, अनिल ग्रोव्हर, ज्योती सुभाष
Producer: गौरी खान, राजकुमार हिरानी, ज्योती देशपांडेDirector: राजकुमार हिरानी
Duration: 2 तास 41 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

राजकुमार हिरानींचा चित्रपट सर्वार्थाने वेगळा असतो. एखादा विषय पटवून देण्यात त्यांची हातोटी असून, कथेचा अभिनयाशी सुरेख मेळ घालण्याची कला त्यांना चांगलीच अवगत आहे. हा चित्रपट बेकायदेशीर इमिग्रेशनवर भाष्य करत सुरेख संदेश देतो, पण हिरानींच्या इतर सिनेमांप्रमाणे परिपूर्ण मनोरंजन करण्यात यशस्वी होत नाही.

कथानक :सिनेमाची सुरुवात इंग्लंडमधील रुग्णालयात असलेल्या मनूपासून होते. रुग्णालयातून पळालेली मनू थेट वकील पुरू पटेलला भेटते आणि आपल्याला भारताचा व्हिजा मिळवून द्यायला सांगते. ते शक्य नसल्याचे पुरू सांगतो तेव्हा तिला हार्डी सिंगची आठवण येते. इकडे हार्डी धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेला असतो. मनूचा फोन येताच सर्व सोडून दुबईला जायला निघतो. मनू मग बुग्गू आणि बल्ली यांनाही भेटते. हार्डी आपल्याला पुन्हा भारतात नेईल याची खात्री असल्याने तिघेही दुबईला जायला निघतात आणि कथा फ्लॅशबॅकमध्ये सुरू होते. त्यात भारतापासून इंग्लंडपर्यंतचा चौघांचा प्रवास आहे.

लेखन-दिग्दर्शन : अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिका धिल्लो यांनी अतिशय कमकुवत कथानकावर 'डंकी'चा डोलारा उभारला आहे. मध्यंतरापूर्वीच्या भागात राजकुमार हिरानींच्या शैलीतील कॅामेडी आणि हल्के फुल्के क्षण अनुभवायला मिळत असले तरी खूप वेळ वाया गेला आहे. मध्यंतरानंतर डंकी रूटने इंग्लंडपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला असला तरी तितकासा रोमांचक वाटत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात चित्रपट अपयशी ठरतो. हिरानींच्या टीममधील नेहमीचे कलाकार लहान-सहान भूमिकांमध्ये दिसतात. कला दिग्दर्शनात खूपच निष्काळजीपणा झाल्याने ९०च्या दशकातील वातावरणनिर्मिती योग्य प्रकारे झालेली नाही. गीत-संगीत चांगले आहे. 

अभिनय : काही दृश्यांमध्ये शाहरुख खानने जीव ओतला असला ती पडद्यावर पाहताना त्याचे वय जाणवते. पुन्हा एकदा शाहरुखचा जलवा पाहायला मिळतो. तापसी पन्नूने आपल्या कॅरेक्टरला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, पण दोघांची केमिस्ट्री आकर्षित करत नाही. छोट्याश्या भूमिकेतही विकी कौशल भाव खाऊन गेला आहे. बोमन इराणीसारख्या कलाकाराला वाया घालवल्यासारखे वाटते. विक्रम कोच्छरने तूफान फटकेबाजी केली आहे. अनिल ग्रोव्हरनेही आपले काम चोख बजावले आहे. ज्योती सुभाष एका सीनमध्ये येऊनही गंमत करून जातात. देवेन भोजानी, अरुण बाली, अमरदीप झा आदींनी चांगलं काम केलं आहे.

सकारात्मक बाजू : अभिनय, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफी, लोकेशन्स

नकारात्मक बाजू : कथा, दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, वेशभूषा, लांबी

थोडक्यात काय तर स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी बेकायदेशीर मार्ग अवलंबणाऱ्या असंख्य भारतीयांची ही कहाणी अखेरीस चटका लावणारी असल्याने एकदा पाहायला हरकत नाही. 

टॅग्स :बॉलिवूडशाहरुख खानतापसी पन्नूविकी कौशलबोमन इराणीसिनेमा