दिग्दर्शक कनू बहल यांनी 'डिस्पॅच' या चित्रपटात वास्तवात कुठेही न दिसणारा, स्वप्नांच्या पलिकडला पत्रकार सादर केला आहे. हे कॅरेक्टर २०११मध्ये हत्या झालेल्या पत्रकार ज्योतिर्मय डे उर्फ जेडे यांच्याशी मिळतेजुळते आहे. या निमित्ताने कनू यांनी चक्रव्यूहात अडकलेल्या पत्रकाराची 'क्राईम स्टोरी' प्रेक्षकांसमोर आणली आहे.
कथानक : डिस्पॅच वर्तमानपत्रातील क्राईम रिपोर्टर जॅाय बागची ही स्टोरी आहे. ऑफिसमध्ये कामाचे टेन्शन आणि घरी पत्नीसोबत पटत नसलेल्या जाॅयचे सहायक लेखिका प्रेमा प्रकाशसोबत सूत जुळलेले असते. शेट्टी प्रकरणाचा तपास करताना एका दुसऱ्या प्रकरणाचे धागेदोरे जॅायच्या हाती लागतात. त्यावर तो काम करत असतो, पण वरीष्ठ त्याला त्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. अखेर पूर्वीची गर्लफ्रेंड आणि पत्रकार नूरीच्या साथीने तो हजारो कोटी रुपयांच्या प्रकरणाच्या घोटाळ्याच्या मागे लागतो. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो.
लेखन-दिग्दर्शन : पटकथा खूपच ढिसाळ आणि वास्तवतेपासून दूर नेणारी आहे. शिवराळ संवाद ओटीटीवर चालत असले तरी त्याचीही पातळी राखणे गरजेचे असते. बोल्ड सीन्सच्या बाबतीतही हेच आहे. क्राईम थ्रिलरला आवश्यक असलेली गती सुरुवातीपासूच कायम राखण्यात आलेली नाही. पत्रकाराचे आयुष्य इतके सुखासीन नक्कीच नाही. दररोज उठून बातम्यांचा शोध घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जॅाय मात्र थेट पोलिसांसोबत रेड टाकायला जातो, पोलिस कोठडीत जाऊन गुंडाला मारहाण करतो, इंटेलिजेंस ऑफिसमध्ये घुसून रेकॅार्डस तपासतो, थेट लंडनला जाऊन अगदी सहजपणे माहितीही गोळा करतो. हे वास्तवातील पत्रकाराला शक्य नाही. डिटेलिंगचा अभाव जाणवतो.
अभिनय : मनोज बाजपेयीने आपले कॅरेक्टर पूर्णपणे अभ्यास करून काहीशा शैलीत साकारले आहे. आजवर बऱ्याच वेब सिरीजमध्ये गुप्तहेर किंवा पोलिसी भूमिका करणाऱ्या मनोजने यात कुठेही त्याची झलक दिसणार नाही याची काळजी घेतली आहे. शहाना गोस्वामीची भूमिका छोटी असली तरी एक-दोन दृश्यांमध्ये तिने जबरदस्त अभिनय केला आहे. चित्रपटाची नायिका अर्चिता अग्रवाल सुंदर असून, हुषार आणि बिनधास्त अभिनेत्री आहे. बोल्ड सीन्सही तिने बेधडकपणे दिले आहेत. इतर कलाकारांनी सहायक व्यक्तिरेखांमध्ये चांगले काम केले आहे.
सकारात्मक बाजू : अभिनय, सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शननकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, बोल्ड सीन्स, गती, संगीत, दिग्दर्शन, वातावरण निर्मितीथोडक्यात काय तर गुन्हेगारी विश्वाचा पर्दाफाश करत समाजातील काळ्या साम्राज्यावर प्रकाश टाकणाऱ्या पत्रकाराची ही बोल्ड 'क्राईम स्टोरी' काहीशी निराश करणारी आहे.