Join us
Daily Top 2Weekly Top 5

Asambhav Movie Review: मुक्ता बर्वे-प्रिया बापट-सचित पाटीलचा 'असंभव' पाहण्याचा विचार करताय? वाचा हा रिव्ह्यू

By देवेंद्र जाधव | Updated: November 22, 2025 18:12 IST

बहुचर्चित असंभव सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. थिएटरमध्ये जाण्याआधी हा रिव्ह्यू नक्की वाचा

Release Date: November 21, 2025Language: मराठी
Cast: सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट, संदीप कुलकर्णी
Producer: शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, मंगेश परुळेकर, संजय पोतदारDirector: सचित पाटील
Duration: २ तास २० मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

रहस्यमयी थ्रिलर सिनेमांची एक गंमत असते. या सिनेमांची मांडणी अशी असते की, प्रेक्षक शेवटपर्यंत खुर्चीला खिळून राहतात. पण सिनेमाच्या शेवटी रहस्याचा उलगडा जर भन्नाट असेल तर खरी मजा येते. नाहीतर सगळा विचका होतो. मुक्ता बर्वे, प्रिया बापट, सचित पाटील यांचा 'असंभव' हा नुकताच रिलीज झालेला असाच एक रहस्यमयी थ्रिलर सिनेमा. हा सिनेमा प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झालाय का? जाणून घ्याकथानक

'असंभव'ची सुरुवात होते तेव्हा, जेव्हा मानसी बिछान्यावर वेदनेने कळवळत असते. अचानक ती दचकून उठते. पेशाने आर्किटेक्ट असलेल्या मानसीची कामानिमित्त यंग बिझनेसमन असलेल्या आदित्य देशमुखसोबत भेट होते. मानसी आणि आदित्य एका मोठ्या प्रोजेक्टसाठी नैनितालला जातात. तिथे आदित्यला मानसी सर्वकाही सांगते. रोज रात्री मानसीला एक भयानक स्वप्न पडतं, याचाच त्रास गेली अनेक वर्ष ती सहन करत असते. 

आदित्यला हे कळताच तो त्याचा सायकोलॉजिस्ट मित्र सत्यजितला बोलावतो. सत्यजित मानसीला संमोहित करुन तिला पडत असलेल्या स्वप्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. पुढे हादरवून टाकणारं रहस्य उलगडतं. मानसीच्या स्वप्नामागची खरी कहाणी काय असते? याचं उत्तर 'असंभव' पाहून मिळेल.

लेखन-दिग्दर्शन

सचित पाटीलने सिनेमाचं दिग्दर्शन आणि पटकथा लिहिली आहे. सिनेमाच्या विषयाला अनुसरुन कथेची वेगवान मांडणी करण्यात सचित यशस्वी झाला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत प्रेक्षकांवर असलेली सिनेमाची पकड सुटत नाही. नैनितालचं सुंदर दर्शन सिनेमात दिसतं. कथा एकच असली तरी तिला अनेक पैलू आहेत. त्यामुळेच प्रत्येक अँगलने कॅमेराची उत्कृष्ट हालचाल करुन सचितने दिग्दर्शनात कमाल केली आहे. भूतकाळ - वर्तमानाचा उत्कृष्ट खेळ त्याने दाखवला आहे. अभिनयमुक्ता बर्वेने नेहमीप्रमाणे कमाल अभिनय केला आहे. आजवर रोमँटिक, गंभीर भूमिकांमध्ये दिसलेली मुक्ता तिच्या अभिनयामुळे 'असंभव'मध्ये रंगत आणते. तिच्या मनातील भीती, दडपण, घुसमट अचूकपणे प्रेक्षकांना जाणवते. सचित पाटीलने डॅशिंग आदित्यची भूमिका सुंदर साकारली आहे. प्रिया बापटने साकारलेली साधनाची भूमिकाही तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि छान आहे. 'श्वास', 'डोंबिवली फास्ट' फेम संदीप कुलकर्णींना सत्यजितच्या भूमिकेत पाहणं एक पर्वणी आहे.

सकारात्मक बाजू: कथा, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय, संगीत, गाणीनकारात्मक बाजू: क्लायमॅक्समधील पुस्तक प्रकाशनाचा प्रसंग

थोडक्यात काय तर, सचित पाटीलने दिग्दर्शित केलेला 'असंभव' तुमचं मनोरंजन करतोच शिवाय तुम्हाला चांगला सिनेमा पाहण्याचं समाधानही देतो. शेवटपर्यंत आपण केलेल्या कल्पनेच्या पलीकडले प्रसंग सिनेमात घडत असतात. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपल्याला धक्का बसतो. हेच 'असंभव'चं यश आहे.

टॅग्स :मुक्ता बर्वेप्रिया बापटसचित पाटीलसंदीप कुलकर्णीमराठी चित्रपटमराठी अभिनेता