- अजय परचुरे
भांडण करणे ही एक कला असू शकते, असं मानणारा एक व्यक्ती या भूतलावर असतो. आपल्यामध्ये ही कला ठासून भरलेली आहे याची जराही कल्पना नसलेला पुण्यातील हा गृहस्थ पुढे जाऊन ही भांडण नावाची ६६ वी कला शिकवण्याचे वर्गच सुरू करतो. ६६ सदाशिव सिनेमाची कथा ही व.पु.काळेंच्या भांडणारे जोशी या कथेपासून प्रेरित आहे. स्पष्टपणे आपले मुद्दे मांडणारा एक व्यक्ती आपल्या या कलेला ६६ व्या कलेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ज्या काही उठाठेवी करतो त्याची गोळाबेरीज म्हणजे ६६ सदाशिव सिनेमा... सिनेमाची कथा अतिशय रंजक आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत राहणारे प्रभाकर श्रीखंडे (मोहन जोशी) . व्यवसायाने ते छायाचित्रकार आहेत. मात्र सध्याच्या डिजीटल युुगातही त्यांना अजूनही आपल्या जुन्या छायाचित्रणाच्या कौशल्यावर जास्त विश्वास आहे. त्यामुळे मोबाईल,फेसबुकच्या सोशल जगातही त्यांचा व्यवसाय हा फारसा सोसेल असा सुरू नाहीये. प्रभाकर श्रीखंडेच्या पत्नी मीना श्रीखंडे (वंदना गुप्ते) या भणंग बनवण्याचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला हातभार लावतात. या दांमपत्याची मुलगी कादंबरी श्रीखंडे(अपूर्वा मोडक) आता लग्नाची झाली आहे. मात्र आपल्या वडिलांच्या विक्षिप्त बोलण्याच्या पध्दतीने,वागण्याने सगळ््याच गोष्टी फसत असतात. मात्र कादंबरीच्या आयुष्यात आलेला अबीर देशपांडे ( योगेश देशपांडे) या कलेला एक कलाटणी देतो. अबीर ६५ व्या कलेत म्हणजेच जाहिरात विश्वाच्या दुनियेत तरबेज असतो. तो प्रभाकर श्रीखंडे यांना त्यांच्यातील ६६ व्या कलेला जन्म देण्यास भाग पाडतो. आणि प्रभाकर श्रीखंडे हे या भांडणाच्या,विक्षिप्तपणाचे पुण्यात चक्क कलास सुरू करतात. ह्या क्लासला वाढत जाणारी लोकप्रियता पाहून शिक्षण मंडळांच्या,स्थानिक नगरसेवकाच्या पोटात दुखू लागतं ते त्यात अडथळे आणण्यास सुरवात करतात. मात्र प्रभाकर श्रीखंडे या सर्व विरोधकांना आपल्या या कलेद्वारे पुरून उरतात की नाही .. आपल्या कलेला राजमान्यता मिळवून देतात की नाही ह्याचा सुंदर धांडोेळा म्हणजे ६६ सदाशिव.