तबला वादनाच्या क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणजे तारानाथ राव. तारानाथ राव यांचा मृत्यू झाला त्याला आता २० वर्षे होत आली. चालू वर्ष हे तारानाथ रावांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. फरुखाबाद घराण्याचा तबला त्यांनी शिकला, वाजवला आणि त्याचा प्रसारही केला. तारानाथ रावांबद्दल आणि त्यांच्या मित्रवर्तुळाबद्दल रविशंकरांनी आपल्या आत्मचरित्रात भरभरून लिहिलं आहे. रविशंकर हे अजिबात नावाजलेले नसताना त्यांना मुंबई शहरात मदत करणाऱ्यांमध्ये तारानाथ राव आणि सबर्बन म्युझिक सर्कलचे शांताराम उल्लाळ आणि हरिहर राव होते. त्यांनी रविशंकरांना एक मंच उपलब्ध करून दिला. त्यामुळे रविशंकर हे नाव श्रोत्यांच्या परिचयाचं झालं.तारानाथांनी अनेक शिष्य तयार केले. रवी आणि शशी बेल्लारे हे सर्वांत ज्येष्ठ शिष्य. आता ते दोघेही हयात नाहीत. ओम्कार गुळवाडी हे सर्व श्रोत्यांच्या परिचयाचे आहेत. उत्कृष्ट संगीतकार म्हणून ते ज्ञात आहेत. बाळकृष्ण अय्यर आणि मोहन बळवल्ली हेही उत्तम संगीतकार म्हणून ज्ञात आहेत. मल्लिकार्जुन मन्सुरांपासून जसराजांपर्यंत ते सर्वांना साथ करत असतात. तारानाथांचे आणखी एक आणि ज्येष्ठ शिष्य म्हणजे सदानंद नायमपल्ली. ते उत्तम एकल वादन करतात आणि संगीतकार आहेत. तारानाथांच्या शताब्दीनिमित्त सबर्बन म्युझिक सर्कलतर्फे परवा जुहूच्या रोटरी सर्विस सेंटरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यात सदानंद नायमपल्ली आणि त्याचा शिष्यवर्ग यांचं तबलावादन झालं. फरुखाबाद आणि बनारस घराण्यातल्या रचना त्यांनी रंगतदारपणे पेश केल्या. समीर नायमपल्ली यांनी उत्तम लेहरा संगत केली. ज्येष्ठ व्हायोलिनवादक मिलिंद रायकर यांची नवी सीडी प्रकाशित होत आहे. व्हायोलिनवादक दामोदर कृष्ण दातारांकडून व्हायोलिनचा गोडवा रायकर यांनी घेतला. गेली काही वर्षे ते जयपूर/अत्रौली घराण्याच्या गानसम्राज्ञी किशोरी आमोणकर यांच्याकडे शिकत आहेत आणि त्यांना साथसंगतही करत आहेत. आज सकाळी दहा वाजता रवींद्र नाट्य मंदिरात हा प्रकाशन सोहळा होत आहे.
आठवण पं. तारानाथांची
By admin | Updated: June 13, 2015 23:39 IST