सरबजीत सिंहनंतर पाकिस्तानातील जेलमध्ये बऱ्याच काळापासून बंदिस्त आणखी एका भारतीय कैद्याचा मृत्यू झाला. या दु:खद वृत्ताबरोबरच पाकिस्तानी जेलमध्ये बऱ्याच काळापासून बंदिस्त कैद्यांच्या सुटकेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. योगायोग हा आहे की, याच मुद्द्यावर आधारित ‘सरबजीत’ चित्रपटाची चर्चादेखील जोरात आहे. मे मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट सरबजीत सिंहच्या जीवनावर आधारित आहे, ज्याला लाहोरच्या जेलमध्ये कैद्यांनी मारून टाकले होते. बॉलीवूडमध्ये अगोदरही असे चित्रपट बनले आहेत, ज्यामध्ये कलाकारांनी पाकिस्तानच्या जेलमध्ये बंदिस्त कैद्यांची भूमिका साकारली आहे. निर्देशक मिलन लथूरियाचा चित्रपट ‘दीवार’मध्ये अमिताभ बच्चनने एक अशा भारतीय सैनिकाची भूमिका साकारली होती, ज्याला १९७१ च्या युद्धादरम्यान आपल्या टीमसोबत पाकिस्तानात कैद करण्यात आले होते. भारताहून त्याचा मुलगा (अक्षय खन्नाची भूमिका) आपल्या वडिलांची तेथील जेलमधून सुटका करण्यासाठी सीमा पार करून जातो. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाला जास्त यश मिळाले नव्हते. याच प्रकारे संजय दत्तने चित्रपट ‘सरहद पार’मध्ये एका अशा भारतीय सैनिकाची भूमिका साकारली होती, जो कित्येक वर्षे पाकिस्तानी जेलमध्ये कैद असतो. मोठ्या कष्टाने त्याची सुटका होते आणि मायदेशी परतण्यात यशस्वी होतो. हा चित्रपट निर्माण होऊन बऱ्याच वर्षांनंतर प्रदर्शित झाला होता. यश चोप्राचा चित्रपट ‘वीर जारा’मध्ये शाहरूख खानने याच प्रकारची भूमिका साकारली होती. पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद भारतीय सेनेतील जवानाच्या भूमिकेतील शाहरूख खानची बाजू तेथील वकील (राणी मुखर्जी) मांडते. शाहरूख, राणी आणि प्रीती झिंटाच्या लव्ह ट्रॅँगलच्या या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर खूप यश मिळाले होते. आगामी चित्रपट ‘सरबजीत’मध्ये प्रमुख भूमिका रणदीप हुडाने साकारली आहे.
- anuj.alankar@lokmat.com