Join us

रिअल लाइफमधील Friends दिसणार रील लाइफमध्ये

By admin | Updated: January 15, 2016 03:41 IST

बऱ्याचदा असं घडतं की, रील लाइफमधील गोष्टींचा संदर्भ रिअल लाइफशी लावला जातो. जसे की, छोट्या-मोठ्या पडद्यावर किंवा रंगमंचावर दिसणाऱ्या जोड्या खऱ्या

बऱ्याचदा असं घडतं की, रील लाइफमधील गोष्टींचा संदर्भ रिअल लाइफशी लावला जातो. जसे की, छोट्या-मोठ्या पडद्यावर किंवा रंगमंचावर दिसणाऱ्या जोड्या खऱ्या आयुष्यात एकमेकांचे साथीदार होतात, पण असं खूप कमी वेळा होतं की, जेव्हा खऱ्या आयुष्यातील घटना पडद्यावर दिसतात. असंच काहीसं झालं आहे, सचिन आणि स्वप्निलच्या बाबतीत. ही धमाकेदार जोडी प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे, हे आपल्याला माहीतच आहे, पण हे दोघेही चित्रपट करण्यापूर्वी १-२ नाही, तर तब्बल ८ वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्यातील ही मैत्री मोठ्या पडद्यावर दिसावी, अशी दोघांचीही इच्छा होती आणि दाक्षिणात्य आर. मधेश दिग्दर्शित ‘Friends' या चित्रपटातून त्यांचे हे स्वप्नं सत्यात उतरत आहे. त्यांच्या या मैत्रीबद्दल सचित पाटील सांगतो, ‘आम्ही जो पहिला चित्रपट एकत्र करू, तो खूप मोठा असावा अशी आमची इच्छा होती. त्यात दुधावरची साय म्हणजे आमचे दिग्दर्शक साउथचे असल्याने ती कल्पनाही सत्यात आली.’ स्वप्निल या चित्रपटातील आणि त्यापूर्वीच्या मैत्रीबद्दल सांगतो, ‘आम्ही खऱ्या आयुष्यात एकमेकांचे चांगले मित्र तर आहोतच, पण या चित्रपटामुळे आम्हाला दोघांनाही एक वेगळ्याच स्वप्निल आणि सचितला भेटता आले. त्यात एकमेकांचे मित्रच असल्याने अभिनयातील स्पर्धेपेक्षाही कोणाचं काही चुकत असेल, तर ते सांगायची किंवा एखादा शॉट जबरदस्त झाला, तर तितकेच त्याचे कौतुकही करायचीही संधी मिळाली आणि आमच्यातील मैत्रीचे बंध अजूनच पक्के झाले.’साउथच्या दिग्दर्शकाचे ‘फ्रेंड्स’मधून मराठीत पदार्पणदोन मित्रांच्या मैत्रीवर भाष्य करणारा ‘फ्रेंड्स’ हा सिनेमा आजपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होत असून, या सिनेमाच्या माध्यमातून साउथ सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आर. मधेश हे मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करीत आहेत. अनेक साऊथ सिनेमे केल्यानंतर त्यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. मराठी सिने इंडस्ट्री सध्या वेगवेगळ्या भाषांमधील कलाकारांना आकर्षित करत असून, अनेक दिग्गज कलाकार मराठीत काम करायचा प्रयत्न करीत आहेत. आर. मधेश हेही त्यातील एक म्हणता येईल. मराठीतील सुपरस्टार स्वप्निल जोशी आणि सचित पाटील यांना घेऊन त्यांनी ‘फ्रेंड्स’ हा सिनेमा केला आहे.अनेक मालिकांमधून दिसलेली गौरी नलावडे ही अभिनेत्री मराठी रूपेरी पडद्यावर एन्ट्री घेते आहे. आर. मधेश हे फक्त दिग्दर्शकच नाहीत, तर निर्माते आणि लेखक म्हणूनही साउथ इंडस्ट्रीत लोकप्रिय आहेत. त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत काम करण्याचाही अनुभव आहे. या नव्या वर्षात मराठीत नव्या असलेल्या या दिग्दर्शकाचा एक कम्प्लिट एन्टरटेन्मेंट पॅकेज असलेला सिनेमा तुमच्या मनोरंजनासाठी येतो आहे. साउथ सिनेमांची भुरळ आजच्या तरुण पिढीला चांगलीच आहे. त्या सिनेमांमधील अ‍ॅक्शन, गाणी सर्वांच्या आवडीचे आहेत. त्यामुळे साउथ सिनेमाची धमाकेदार स्टाईल एका साउथ सिने दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनातून बघायला मिळणार असल्याने, या सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच त्यांनी या सिनेमाचं लेखनही केलं आहे, तर सिनेमा रीलिज होण्याआधीच सिनेमातील गाणी सोशल मीडियात सुपरहिट ठरली आहेत. सचित- स्वप्निलच्या ग्लॅमरला साउथच्या कल्पकतेची जोडमराठीमधील अत्यंत ग्लॅमरस जोडी असलेल्या स्वप्निल जोशी आणि सचित पाटीलच्या ग्लॅमरला ‘फ्रेंड्स’च्या निमित्ताने साउथच्या कल्पकतेची जोड मिळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आर. मधेश या निमित्ताने प्रथमच मराठीमध्ये येत आहेत. सिनेमाची चित्रभाषा म्हणजे काय, याचे उदाहरण ‘फ्रेंड्स’मध्ये पाहायला मिळणार आहे. याबाबत स्वप्निल म्हणतो, ‘पहिल्यांदा जेव्हा आर. मधेश यांच्याशी भेट झाली, तेव्हा समजले की, त्यांना मराठी येत नाही. मला धक्काच बसला. मात्र, शूटिंगच्या वेळी समजलं की, चित्रपटाची भाषा ही भाषेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी असते. एका शॉटमध्ये मी एक डायलॉग म्हणायला विसरलो होतो. मधेश यांनी त्यांच्या असिस्टंटला विचारले की, हा डायलॉग म्हटला का? माझ्या अभिनयावरून तो डायलॉग म्हटला गेलेला नाही, हे त्यांनी ओळखले होते. मधेश यांच्याकडून खूप वेगळ्या प्रकारचा अभिनय शिकायला मिळाला.’कौटुंबिक, विनोदी व अ‍ॅक्शनहीकौटुंबिक, विनोदी आणि अ‍ॅक्शन असा तिहेरी संगम हे ‘फ्रेंड्स’चे एक वैशिष्ट्य आहे. स्वप्निल आणि सचितमधील मैत्री कशी आहे, दोघांमधली दोस्ती? काय आहे या दोस्तीचा दुवा? का टिकून आहे ती? असे कितीतरी प्रश्न आहेत. अर्थात, याची उत्तरं आपल्याला चित्रपटगृहात जाऊनच शोधावी लागतील. कौटुंबिक असूनही विनोदी आणि तितकाच हा अ‍ॅक्शनपट आहे. सचित पाटीलची अ‍ॅक्शन हे या चित्रपटाचे एक आकर्षण ठरणार आहे.