Join us

रवीच्या ‘न्यूड’ची चर्चा

By admin | Updated: October 1, 2015 23:15 IST

समाजातील वास्तव चित्रपटाच्या माध्यमातून मांडणे हे दिग्दर्शक रवी जाधव यांचे वैशिष्ट्य. आता हेच पाहा ना, ‘नटरंग’मधून एका कलाकाराचे जीवन उलगडण्यात आले

समाजातील वास्तव चित्रपटाच्या माध्यमातून मांडणे हे दिग्दर्शक रवी जाधव यांचे वैशिष्ट्य. आता हेच पाहा ना, ‘नटरंग’मधून एका कलाकाराचे जीवन उलगडण्यात आले, तर ‘टाइमपास’ आणि ‘टाइमपास 2’मधून टीनएजर्सचे प्रेम उलगण्याबरोबरच प्रेम म्हणजे टाइमपास नसतो... असा संदेशही नकळतपणे देण्यात आला. ‘बालक-पालक’मध्ये तर लैंगिक शिक्षण मुलांना देणे किती गरजेचे आहे, याचा जणू पाठच देण्यात आला. ‘बायोस्कोप’मध्ये समलिंगी संबंधांवर प्रकाशझोत टाकणारी ‘मित्रा’ ही कथादेखील मांडण्यात आली. एक विशिष्ट विषय डोळ्यांसमोर ठेवून चित्रपटांची निर्मिती करण्यात रवी जाधव यांचा तसा विशेष हातखंडा. त्यामुळेच या प्रतिभावंत दिग्दर्शकाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षाही आता उंचावल्या आहेत. ‘बँजो’मधून हा दिग्दर्शक हिंदीमध्ये पदार्पण करीत आहे, हेदेखील सर्वश्रुत आहेच; पण सध्या रवी जाधव हे नाव एका वेगळ्याच कारणामुळे गाजत आहे. त्यांच्या आगामी ‘न्यूड’ या चित्रपटाचे पोस्टर हे सोशल नेटवर्किंग साईटवर झळकल्यामुळे सर्वत्र या चित्रपटाची चर्चा ऐकायला मिळत आहे. हे पोस्टर रेग्युलर पोस्टरपेक्षा खूपच वेगळे भासत आहे. यावरून चित्रपटाचा विषय काहीसा बोल्ड किंवा संवेदनशील असावा, अशी चर्चा आहे. या चित्रपटावर गेल्या ९ महिन्यांपासून रवी जाधव काम करीत आहेत. २०१६मध्ये हा चित्रपट प्रसिद्ध होईल.