Join us

रवींद्र जैन यांच्या निधनाने बॉलीवूडला मोठा धक्का

By admin | Updated: October 12, 2015 04:25 IST

रवींद्र जैन यांच्या निधनाने भारतीय संगीत आणि त्यातही चित्रपट संगीताला मोठाच धक्का बसला आहे. ज्या वेळी संगीतावर बाजाराचे दडपण नव्हते, त्या काळातील पिढीचे प्रतिनिधित्व त्यांचे संगीत करीत होते

रवींद्र जैन यांच्या निधनाने भारतीय संगीत आणि त्यातही चित्रपट संगीताला मोठाच धक्का बसला आहे. ज्या वेळी संगीतावर बाजाराचे दडपण नव्हते, त्या काळातील पिढीचे प्रतिनिधित्व त्यांचे संगीत करीत होते. त्या वेळी संगीत हाच चित्रपटांचा आत्मा बनला होता. त्यामुळेच रवींद्र जैन यांच्या जाण्याने एका पिढीचा शेवट झाल्याचे म्हणता येईल. रवींद्र जैन जेव्हा चित्रपटाच्या दुनियेत आले, तेव्हा संगीताला एक स्थान मिळाले. ५० च्या दशकाच्या अखेरीस चित्रपटात संगीताची पकड मजबूत झाली होती. त्या वेळी दिग्गज मंडळी संगीतकार म्हणून कार्यरत होती. या स्थितीत रवींद्र जैन यांना रस्ता शोधणे सोपे नव्हते. संगीतात स्वत:ची ओळख निर्माण करणे हे कठीण काम आहे.विशेष म्हणजे ते कोणत्याही संगीतविषयक परिवारातून आलेले नव्हते. ते कोलकाता येथून मुंबईला आले त्याचवेळी ते संघर्ष करण्याच्या मन:स्थितीनेच आले होते. या संघर्षात त्यांना ‘राजश्री’ प्रॉडक्शनची साथ मिळाली नसती तर त्यांचे काय झाले असते, याची कल्पना करवत नाही. ‘राजश्री’चे बॅनर छोट्या बजेटचे चित्रपट बनवत असे आणि नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येत असे. नवीन चेहरे याचा अर्थ केवळ नट-नट्या नव्हे, तर पूर्ण टीमच नवीन शोधण्यात येई. येथेच राजश्री आणि रवींद्र जैन यांचे सूर जुळले. दोघे एकमेकांना पूरक होते आणि दोघांचीही मजबुरी होती.कोणत्याही अटीशिवाय काम करणारे रवींद्र जैन हे संगीतकार होते. अशा मंडळींना राजश्रीने संधी दिली. यानिमित्ताने रवींद्र जैन यांना दोन संधी मिळाल्या. एक तर राजश्री हे तसे प्रतिष्ठित बॅनर होते आणि चित्रपटसृष्टीत शिरकाव करता आला; पण मोठ्या बॅनरमध्ये काम न मिळाल्याचे नुकसानही जैन यांना सोसावे लागले. कदाचित जैन यांनी स्वत:ला या कक्षेतून बाहेर ठेवले, असे म्हणावे लागेल. येथे त्यांचा मुकाबला शंकर-जयकिशन, मदनमोहन, एस.डी. बर्मन, सी. रामचंद्र, ओ.पी. नय्यर यासारख्या दिग्गजांशी होता. हा मुकाबला सोपा नाही, हे सर्व जण जाणून होते. मोठ्या समुद्रात छोटा मासा बनण्यापेक्षा छोट्या तलावात मोठा मासा बनण्यात ते यशस्वी झाले.राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाला संगीत देण्याची मिळालेली संधी ही वेगळी बाब होती. राज कपूर यांनी ‘घूंघट के पट खोल’ या नावाचा चित्रपट काढण्याची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी त्यांनी जैन यांना दिली होती. हा चित्रपट छोट्या बजेटचा होता. त्या वेळी राज कपूर यांचे आवडते संगीतकार शंकर-जयकिशन ‘मेरा नाम जोकर’चे संगीत तयार करण्यात व्यस्त होते. ‘मेरा नाम जोकर’ हा राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यामुळे ‘घूंघट के पट खोल’ या चित्रपटाचे काम राज कपूर यांनी पहिल्यांदा लांबणीवर टाकले आणि नंतर ते बंदच केले; पण त्या काळात जैन यांनी राज कपूर यांच्यासाठी काही धून तयार केल्या होत्या.शंकर-जयकिशन यांच्या निधनानंतर ‘राम तेरी गंगा मैली’चे काम सुरू झाले. त्या वेळी राज कपूर यांना जैन यांची आठवण झाली आणि त्यांनी तयार केलेल्या धूनचा वापर केला. ‘हिना’चा किस्साही असाच होता. या दोन चित्रपटांतून जैन आर.के. बॅनरशी जुळले. असे झाले नसते तर ते केवळ राजश्री आणि अन्य छोट्या बॅनरशीच जुळले असते. ते पारंपरिक संगीताला प्राधान्य देत आणि त्यातच स्वत:चा सूरही वापरत.त्या काळातील संगीत आणि संगीतकारांच्या जगात रवींद्र जैन यांचे संगीत एक खजिना आहे. संघर्ष करीत करीतच जैन यशस्वी झाले आणि इतिहासाचा एक भाग बनले.