Rani Mukerji's Mardaani 3: अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) २०१४ साली 'मर्दानी' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर आली होती. पोलीस अधिकारी शिवानी रॉय या अॅक्शन भूमिकेतून आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांना थक्क केलं. त्यानंतर 'मर्दानी' चित्रपटाचा दुसरा भाग २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकाचं भरभरुन प्रेम मिळालं. त्यानंतर प्रेक्षक तिसरा भाग कधी प्रदर्शित होतो, याकडे डोळे लावून होते. अखेर आता 'मर्दानी' चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची (Mardaani 3) रिलीज डेट समोर आली आहे.
यश राज फिल्म्सकडून 'मर्दानी ३'ची रिलीज डेटची जाहिर करण्यात आली आहे. पुढील वर्षी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी 'मर्दानी ३' प्रदर्शित होणार आहे. दोन ब्लॉकबस्टर हिट दिल्यानंतर आता 'मर्दानी ३' बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड रचण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा राणी मुखर्जीचा भारदस्त अभिनय पाहता येणार आहे. राणी मुखर्जीने 'मर्दानी' मध्ये शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारली आहे, जी एक बिनधास्त आणि धाडसी पोलीस अधिकारी आहे. जी नेहमीच न्यायासाठी लढताना दिसते.
'मर्दानी'मध्ये ताहिर राज भसीनने खलनायकाची भूमिका केली होती. त्यानंतर विशाल जेठवाने 'मर्दानी २' मध्ये एका सायको क्रिमिनलची भूमिका साकारली होती. आता 'मर्दानी ३' चा खलनायक कोण आहे, हे निर्मात्यांनी गुप्त ठेवलं आहे. माहितीनुसार, 'मर्दानी ३' पटकथा लेखन आयुष गुप्ता यांनी केलं आहे. तर दिग्दर्शनाची धुरा अभिराज मीनावाला यांनी पार पाडली.
राणी मुखर्जी शेवटची 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही, मात्र राणीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. यासाठी तिला अबू धाबीमध्ये पार पडलेल्या IIFA २०२४ पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.