Join us

"लग्नासाठी वडिलांनी कर्ज काढलं आणि...",राजा गोसावींची लेक झाली भावुक, सांगितला कठीण काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:27 IST

मराठी सिनेसृष्टीतील एकेकाळचे सुपरस्टार म्हणून ‘राजा गोसावी’ ओळखलं जायचं. 

Shama Deshpande: मराठी सिनेसृष्टीतील एकेकाळचे सुपरस्टार म्हणून ‘राजा गोसावी’ ओळखलं जायचं. आपल्या सहजसुंदर अभिनयातून विनोदातील 'राजा'ने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. एकेकाळी श्रीमंती, सुख-समृद्धी अनुभवलेल्या या अभिनेत्याने पडता काळही पाहिला. याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजा गोसावींची लेक शमा यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी सांगितलं आहे.

नुकतीच राजा गोसावींची लेक शमा देशपांडे यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, शमा देशपांडेंनी त्यांच्या लग्नासाठी वडिलांनी कर्ज काढलं होतं असं म्हटलं. हा सगळा प्रवास सांगताना त्या प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा त्या म्हणाल्या, "मला खूप वाईट वाटलं होतं कारण ते शूटिंग करत होते आणि त्या लंच ब्रेकमध्ये येऊन त्यांनी शिवाजी मंदिरच्या वरती एक बँक होती तिथून त्यांनी कर्ज काढलं होतं. त्यावेळी मला ते फार वाईट वाटलं, म्हणजे मी माझ्या कर्तव्यात कुठेतरी कमी पडले असं वाटत होतं. आता माझ्या माहेरी माझी गरज आहे आणि अशा वेळेला मी पाठ दाखवून लग्न करून निघून जातेय आणि ते सगळे दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी माझ्या वडिलांना कर्ज घ्यावं लागतंय ते मला फार दु:ख झालं. कारण लग्न पण त्यांचं तोडीचं करणं भाग होतं ना कारण सासरकडची परिस्थिती चांगली होती आणि राजा गोसावींच्या मुलीचं लग्न म्हणल्यावरती त्यांच्यावरती ते प्रेशरचं आलं होतं."

त्यानंतर पुढे त्या म्हणाल्या, "आजही माझ्या मनामध्ये ती सल आहे. माझ्या आई-वडिलांसाठी मी खूप काही करू शकले असते पण, मला नाही करता आलं. म्हणजे त्यांचं जे देणं होतं, मी खूप लोकांसाठी करत गेले नंतर यश मिळाल्यानंतर ते दोघेही नव्हते. म्हणजे माझ्या वयाच्या २६ व्या वर्षी माझी आई गेली आणि माझ्या वयाच्या ३५ व्या वर्षी माझे वडीलही गेले. त्यानंतर  त्यानंतर मला सगळी सुबत्ता समृद्धी मिळत गेली ते त्याचे खरे वाटेकरी होते." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकार