Join us

"पाकिस्तानी क्रिकेटर्स भारतात आले, आता कलाकारांनाही बोलवूया का?"; रईसच्या दिग्दर्शकाचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 20:01 IST

"कशाला उडता तीर...", राहुल ढोलकीयाच्या ट्विटचा युजर्सने चांगलाच समाचार घेतला

Pakistan in India for World Cup, Rahul Dholakia: पाकिस्तानी क्रिकेटपटू २७ सप्टेंबरच्या संध्याकाळी दुबईमार्गे हैदराबादला पोहोचले. हैदराबादमध्ये खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. तब्बल ७ वर्षांनंतर हे पाकिस्तानी खेळाडू भारतीय भूमीवर उतरले आहेत. २०१६ च्या 'टी-20 वर्ल्ड कप'नंतर पाकिस्तानचा हा पहिलाच भारत दौरा आहे. उरी दहशतवादी हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांना भारतात बंदी घालण्यात आली होती. आता पाकिस्तानी खेळाडू भारतात येत असल्याच्या वृत्तावर 'रईस'चे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी पाकिस्तानी कलाकार आणि गायकही भारतात परफॉर्म करण्याची आशा व्यक्त केली आहे.

राहुल ढोलकियाने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, "आता पाकिस्तानी क्रिकेटर्स अधिकृतपणे येथे आले आहेत. आता आम्ही आमच्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी पाकिस्तानी कलाकारांना किंवा संगीत कार्यक्रमांसाठी संगीतकारांना अधिकृत आमंत्रण देऊ शकतो का?"

ढोलकीयांच्या विधानावरून अपेक्षित वाद उफाळून आलाच. या पोस्टवर लोकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले- सर तुम्ही कशाला उगाच नको तो विषय काढत आहात? एकाने म्हटले- बॉलीवूड नेहमीच सॉफ्ट टार्गेट आहे, जर क्रिकेटर्सना परवानगी मिळते तर अभिनेत्यांना का नाही? दुसऱ्या युजरने लिहिले- का? भारतात प्रतिभा कमी आहे का? आणखी एक व्यक्ती म्हणाली- तुम्ही हे प्रश्न त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना विचारा, जे तुमच्यासाठी सीमेवर तैनात आहेत. मग तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल.

--

--

 

टॅग्स :पाकिस्तानभारतशाहरुख खानबॉलिवूड