Join us  

चित्रीकरणादरम्यान प्रिया प्रकाशच्या डोक्याला झाली दुखापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 2:03 PM

क्रॅक या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना प्रियाचा नुकताच अपघात झाला असून तिच्या डोक्याला मार लागला आहे.

ठळक मुद्देप्रियाने शेअर केलेल्या व्हिडिओत आपल्याला दिसत आहे की, या चित्रपटातील नायक पुढे चालत असून प्रिया उडी मारत त्याच्या पाठीवर बसण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिला तोल जाऊन ती खाली पडलेली दिसत आहे.

प्रिया प्रकाश वारिअरचा एक डोळ्यांनी इशारा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. देशभरातील लोकांना हा व्हिडीओ आवडला होता. त्यानंतर प्रियाला मोठी लोकप्रियता मिळाली. प्रियाच्या या लोकप्रियतेनंतर तिला अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आता ती क्रॅक या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना प्रियाचा नुकताच अपघात झाला असून तिच्या डोक्याला मार लागला आहे.

प्रियानेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिच्या या अपघाताविषयी सांगितले आहे. क्रॅक या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण करताना तिचा हा अपघात झाला आहे. प्रियाने शेअर केलेल्या व्हिडिओत आपल्याला दिसत आहे की, या चित्रपटातील नायक पुढे चालत असून प्रिया उडी मारत त्याच्या पाठीवर बसण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिला तोल जाऊन ती खाली पडलेली दिसत आहे. ती डोक्यावर आपटलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रिया पडताच तिच्या चित्रपटाची टीम धावत तिच्याजवळ आली आहे. पण काही झाले नाही... मी व्यवस्थित आहे असे सांगत प्रिया पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करत आहे.

प्रियाने या व्हिडिओसोबत खूपच छान पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, हे आयुष्य मला सतत खाली पाडण्याचा प्रयत्न करते. सतत माझ्या वाटचालीत अडचणी आणते. ही पाहा त्याची एक झलक. खाली पडल्यावर मी प्रत्येकवेळी उभी राहाते आणि आत्मविश्वासानं संकटांचा सामना करते.

प्रियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या तिच्या व्हिडिओला अनेक लाईक मिळाले आहेत.  

टॅग्स :प्रिया वारियर