ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'मुगल' सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित असलेला 'मुगल' हा सिनेमा लवकरच येणार आहे. या सिनेमात गुलशन कुमार यांच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे.
'टॉयलेटः एक प्रेम कथा' या सिनेमानंतर अक्षय कुमार आता नवीन 'मुगल' सिनेमाच्या शूटींगकडे वळला आहे. दरम्यान, अक्षय कुमारने याबाबत ट्विट केले असून माझ्या पहिल्या सिनेमाची सुरुवात गुलशन कुमार यांच्यापासून झाली. ते संगीत सम्राट होते, त्यांची भूमिका निभावण्यास उत्सुक आहे, असे म्हटले आहे.
संगीतकार गुलशन कुमार यांची 1997 मध्ये मुंबईतील जीतेश्वर महादेव मंदिराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'मुगल' या सिनेमाची निर्मिती त्यांची पत्नी सुदेश कुमारी करणार आहेत. तर, या सिनेमाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार आहेत. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला जॉली एलएलबी-2 या सिनेमाचे दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केले होते, तर यामध्ये प्रमुख भूमिका अक्षय कुमारने साकारली होती.
'मुगल' हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित होणार आहे.