Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’च्या प्लॅटफॉर्मवर कविता लाड!

By admin | Updated: October 19, 2016 02:33 IST

कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोने छोट्या पडद्यावरील रसिकांना पोट धरून हसवले आहे.

कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोने छोट्या पडद्यावरील रसिकांना पोट धरून हसवले आहे. रसिकांचे दिलखुलास मनोरंजन आणि हसवता हसवता एखादा सामाजिक संदेश यामुळे कॉमेडीची ही बुलेट ट्रेन रसिकांना भलतीच भावली आहे. आता नव्या अंदाजात, नव्या जजेस, नव्या होस्टसह ही कॉमेडीची बुलेट ट्रेन रसिकांच्या भेटीला आली आहे. दर आठवड्याला या शोमध्ये प्रसिद्ध कलाकार हजेरी लावतात. यंदाच्या आठवड्यात कॉमेडीची बुलेट ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर अवतरणार आहेत अभिनेत्री कविता लाड. गेल्या आठवड्यात अरुण नलावडे आणि स्वाती चिटणीस यांनी या कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये हजेरी लावली होती. इतकेच नाही, तर स्वाती चिटणीस यांनी सादर केलेले कोजागिरी पौर्णिमेवरील स्किटही रसिकांना भावले होते. आता या आठवड्यात कविता लाडसुद्धा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी या शोमध्ये हजेरी लावत आहेत. रंगभूमी आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने त्यांनी रसिकांवर जादू केली आहे. एका लग्नाची गोष्ट, चार दिवस प्रेमाचेमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा कॉमेडीची बुलेट ट्रेनच्या माध्यमातून कविता लाड रसिकांच्या भेटीला येणार आहेत. या शोमधील विनोदवीरांसह त्या एक स्किटसुद्धा सादर करणार आहेत. त्यांच्या विनोद कौशल्याने शोमधील विनोदवीर, जज महेश कोठारे आणि सोनाली कुलकर्णी यांना हसून हसून लोटपोट केले. त्यामुळे रसिकांनाही कविता लाड यांचे हे स्किट नक्कीच पोट धरून हसवेल, यात शंका नाही.