- प्राजक्ता चिटणीस‘चष्मे बद्दूर, बेबी, पिंक’ यासारख्या चित्रपटांत तापसी पन्नू झळकली आहे. पिंक या चित्रपटातील तिच्या अभिनयाला सगळ्यांनीच प्रचंड दाद दिली. पिंक या चित्रपटानंतर आता ‘रनिंगशादी डॉट कॉम’ हा तिचा चित्रपट येत आहे. तापसीने दाक्षिणात्य चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आज पिंकनंतर तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे. तिच्या या करिअरबद्दल तिच्याशी मारलेल्या गप्पा...पिंक हा चित्रपट तुझ्या कारकिर्दीमधला एक टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाबद्दल तू काय सांगशील?पिंक हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरेल, असा मला विश्वास होता; पण हा चित्रपट लोकांना इतका आवडेल, असे आम्हाला कोणालाच वाटले नव्हते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज इतके महिने झाले असले, तरी प्रेक्षक आजही या चित्रपटाविषयीच माझ्याशी गप्पा मारतात. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात या चित्रपटाची नक्कीच नोंद घेतली जाईल, याची मला खात्री आहे. या चित्रपटाचा माझ्या कारकिर्दीला खूप फायदा झाला. आपल्याकडे तुम्ही गंभीर भूमिका साकारू शकला, तरच तुम्ही चांगले कलाकार आहात, असे मानले जाते. त्यामुळे पिंकनंतर माझ्या अभिनयक्षमतेची ओळख सगळ्यांना झाली आहे. पिंकनंतर मला खूपच चांगल्या आॅफर मिळत आहेत. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना करिअर करणे कठीण असते, असे तुला वाटते का?कोणीही गॉडफादर नसतो, त्या वेळी तुम्हाला मिळालेल्या संधीचे सोने करणे गरजेचे असते. तुम्ही एखादी जरी चूक केली, तरी तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाहीये, ही गोष्ट सतत लक्षात ठेवावी लागते. तसेच, जोपर्यंत तुम्ही चार-पाच हिट चित्रपट लागोपाठ देत नाही, तोपर्यंत या इंडस्ट्रीत टिकणे तुमच्यासाठी कठीण असते. तुम्ही ज्या वेळी बॉलिवूडमध्ये आऊटसाईडर असता, त्या वेळी तुम्ही फिल्मी पार्ट्यांना जाण्यासाठी कम्फर्टेबल नसता. केवळ चित्रपट मिळविण्यासाठीच नव्हे, तर सगळ्याच गोष्टींसाठी तुम्हाला स्ट्रगल करावा लागतो. पण, मी आऊटसाईडर आहे, ही गोष्टी पोझिटिव्हली घेते. यामुळे मी अधिकाधिक मेहनत घेते. भविष्यात कशा प्रकारच्या भूमिका साकारायच्या असे तू ठरवले आहेस?पिंक या चित्रपटानंतर लोकांना मी त्यांच्यापैकी एक असल्याचे वाटायला लागले आहे. भविष्यातदेखील अशाच प्रकारच्या भूमिका साकारायच्या, असे मी ठरवले आहे. लोकांना मी त्यांच्यामधीलच एक आहे असे वाटावे, यासाठी मी प्रयत्न करीन. रनिंगशादी डॉट कॉम या चित्रपटात तू जोडप्यांना लग्न करण्यास मदत करण्यासाठी एक वेबसाईट सुरू करतेस. तुझे स्वत:चे लव्ह मॅरेजविषयी मत काय?आजही आपल्या देशात लव्ह मॅरेज करणे हे अतिशय वाईट मानले जाते. मी माझ्या एका लांबच्या नातेवाइकांच्या लग्नाला पटियाला येथे गेले होती. मी लग्नात गेल्यावर सहजच लग्न लव्ह मॅरेज आहे की अॅरेज मॅरेंज, असे विचारले. माझा प्रश्न ऐकताच समोरच्या स्त्रीचा स्वरच बदलला. ‘लव्ह मॅरेज नाही अॅरेज मॅरेजच आहे,’ असे ती मला ठणकावून सांगू लागली. पटियालासारख्या शहरात अशी अवस्था आहे, तर खेडेगावात काय असेल, असा मी विचार तेव्हा केला होता.
'पिंक’ने मिळवून दिली खरी ओळख'
By admin | Updated: January 20, 2017 02:25 IST