1 / 7'मी कुटून राह्यली, माझ्या नवऱ्याची बायको', अशा उत्कंठावर्धक प्रोमोनं २२ ऑगस्ट २०१६ ला छोट्या पडद्यावर झळकलेल्या 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेनं अखेर गेल्या रविवारी प्रेक्षकांचा निरोप घेतला. गुरुनाथ आणि राधिका यांच्या आयुष्यात शनाया नावाच्या वादळाचं येणं आणि घोंघावणं, हा या मालिकेचा मूळ धागा होता. पण, पुढे हे धागे इतके गुंतत गेले की विचारता सोय नाही.2 / 7खरं तर, 'पती, पत्नी और वो' अशा स्वरूपाच्या कथानकावर आधारित अनेक सिनेमे, मालिका याआधीही आल्यात. शेवटी नवऱ्याला बरोब्बर वठणीवर आणणाऱ्या, अद्दल घडवणाऱ्या 'राधिका' त्यात होत्या. त्यापेक्षा ही राधिका सुभेदार कशी वेगळी ठरते, याबद्दल उत्सुकता होती. पण, बहुतांश मालिकांच्या बाबतीत जे होतं, तेच 'माझ्या नवऱ्याची बायको'चंही झालं आणि 'कुटाकुटी'ऐवजी कथा कुठच्या कुठं गेली. 3 / 7गुरुनाथ - शनाया प्रकरण कळल्यावर हादरलेली, असहाय्य झालेली राधिका ते पदर खोचून - धीर एकवटून ३०० कोटींच्या (नंतर ते ६०० कोटीही झाले) मसाले कंपनीची मालकीण असलेली राधिका, अशी या मालिकेची सुरुवातीला ठरलेली कथा असावी. पण, साडेचार वर्षांमध्ये त्यात आलेले ट्विस्ट अँड टर्न सांगायचे तर एक पुस्तक सहज होईल. 4 / 7गुरू-शनायाचं ब्रेक अप, मायाची एन्ट्री, सौमित्र-राधाचं मनोमीलन, राधिका-शनायाची 'युती', राधिका-शनाया-माया यांची 'आघाडी', शेवटपर्यंत न झालेलं जेनीचं बाळंतपण, हे मालिकेतील काही महत्त्वाचे टप्पे. एवढं सगळं होऊनही, गुरुनाथ काही शेवटपर्यंत सुधारलेला नाही.5 / 7'माझ्या नवऱ्याची बायको'च्या शेवटच्या भागात गुरूनं आपल्या चुकांचा पाढा वाचला, पण मालिका संपता-संपता तो श्रुती मराठेच्या बॅगा उचलतानाही दिसला आहे. श्रुतीच्या या एन्ट्रीमुळेच मालिकेच्या सिक्वलची - अर्थात 'माझ्या नवऱ्याची बायको - २' ची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.6 / 7टीआरपीच्या शर्यतीत 'माझ्या नवऱ्याची बायको' बराच काळ अव्वल होती. त्यामुळे मालिकेचा पुढचा भाग आणण्याबाबत वाहिनी विचार करू शकते. अर्थात, अजून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. 7 / 7मालिकांचे सिक्वल येण्याचा ट्रेंड तसा जुनाच आहे. झी मराठीवरही काही मालिकांचा सिक्वल आला आहे. आता तर रात्रीस खेळ चाले - ३ सुरू होतंय. अण्णा नाईक परत येताहेत. त्यामुळे गुरू-राधिका अँड कंपनीही परत आल्यास आश्चर्य वाटायला नको.