Join us  

Dilip Kumar: अभिनेता दिलीप कुमार अन् बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्या मैत्रीचे किस्से; का वाढला दुरावा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 10:43 AM

1 / 12
बॉलिवूडचे ट्रेजेडी किंग म्हणून प्रचलित असणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षांचे होते. अभिनेता आणि राजकीय नेता यांच्यातील संबंध अनेकदा आपण वाचले असतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि दिलीप कुमार यांच्यातही अखेरपर्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते.
2 / 12
दिलीप कुमार यांचे राजकीय विचार त्यांच्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्यावर प्रभाव टाकणारे होते. अमिताभ बच्चन, सुनील दत्त आणि राजेश खन्नासारख्या अभिनेत्याप्रमाणे ते कधीही सक्रीय राजकारणात आले नाहीत. परंतु नेहमी राजकारणाशी निगडीत राहिले.
3 / 12
ज्येष्ठ पत्रकार रशीद किदवई यांनी काही वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात राजकारणाशी नाळ असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्यांबाबत खूप सविस्तर भाष्य केले होते. या पुस्तकातील एक अध्याय हा बॉलिवूडमधील ट्रेजेडी किंग दिलीप कुमार यांच्याबाबतीतही आहे.
4 / 12
दिलीप कुमार नेहमी पक्के काँग्रेसी विचारधारेचे होते. त्यांचे वडील आणि आजोबा अखंड भारतातील पेशावरमध्ये राहत होते. पेशावर शहर सध्या पाकिस्तानात आहे. ते दोघंही काँग्रेसी होते. लहानपणापासून काँग्रेस विचारधारा दिलीप कुमारांच्या मनात रुजली होती.
5 / 12
दिलीप कुमार सिनेमात आल्याच्या १८ वर्षानंतर त्यांनी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या राजकारणात आले होते. तेव्हा पश्चिम बॉम्बे मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा त्यांनी प्रचार केला होता. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीतही दिलीप कुमार यांनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला होता. मात्र असं असतानाही राजकारणात त्यांची सर्वपक्षीय मैत्री होती.
6 / 12
दिलीप कुमार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. बाळासाहेब जेव्हा मार्मिकमध्ये कार्टून रेखाटत होते तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत होते. या दोघांनी एकमेकांच्या कलेचा आदर केला. बाळासाहेबांच्या मातोश्री निवासस्थानी दिलीप कुमार यांचे येणेजाणे होते. ठाकरे कुटुंबासोबत दिलीप कुमारांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
7 / 12
१९९७ मध्ये पाकिस्तान सरकारने दिलीप कुमार यांना निशान-ए-इम्तियाज या पुरस्काराने गौरवलं आणि सन्मानासाठी त्यांना पाकिस्तानात बोलावलं होतं. तेव्हा बाळासाहेबांनी दिलीप कुमार यांच्यावर जाहीरपणे टीका केली. बाळासाहेब ठाकरेंचे पाकिस्तानबद्दल परखड विचार सर्वांनाच ज्ञात होते.
8 / 12
दिलीप कुमार यांनी एका पुस्तकात याबद्दल सांगितले की, मी मुस्लीम असल्याने अनेकदा माझ्याकडे संशयाने पाहिलं जात होते. मात्र ३० वर्ष जुन्या आपल्या मित्रानेही त्यांच्या प्रामाणिकपणा आणि देशभक्तीवर संशय घेतला त्याचं दिलीप कुमार यांना दु:खं झालं. दिलीप कुमार यांनी बाळासाहेबांचा विरोध झुगारून पाकिस्तानला पुरस्कार घेण्यासाठी गेले.
9 / 12
कारगिल युद्धानंतर बाळासाहेबांनी दिलीप कुमार यांना पाकिस्तानने दिलेला पुरस्कार परत द्यायला सांगितला. तेव्हाही दिलीप कुमार यांनी स्पष्टपणे नकार दिला. हा पुरस्कार माझ्या सामाजिक कार्यासाठी दिला आहे. भारत आणि पाक यांना जवळ आणण्यासाठी मिळाला आहे असं दिलीप कुमार म्हणाले. या कारणांमुळे दोघांच्या मैत्रीत दुरावा आला. कालांतराने दोघांमधील वाद संपुष्टात आले आणि पुन्हा मैत्री जपली.
10 / 12
बाळासाहेबांप्रमाणे शरद पवारही दिलीप कुमार यांचे मित्र होते. काँग्रेस नेता रजनी पटेल या शरद पवार आणि दिलीप कुमार यांच्या मैत्रीच्या दुवा होत्या. दिलीप कुमार यांनी शरद पवार यांचा निवडणूक प्रचारही केला आहे. दिलीप कुमार आणि सायराबानो यांचं वैवाहिक आयुष्य मोडण्याच्या मार्गावर असताना शरद पवार यांनीच महत्त्वाची भूमिका निभावली.
11 / 12
दिलीप कुमार यांनी पाकिस्तानी महिला आणि ३ मुलांची आई असलेल्या अस्मा रहमानसोबत निकाह केला. १९८२ मध्ये ही बातमी सर्वत्र पसरली. तेव्हा सायराबानोने दिलीप कुमार यांना सोडण्याचा निर्णय घेतला. दिलीप कुमार यांच्या सांगण्यावरून शरद पवार, रजनी पटेल यांनी मध्यस्थी करून या दोघांचे वैवाहिक आयुष्य मोडण्यापासून वाचवलं.
12 / 12
मुंबई बॉम्बस्फोटात संजय दत्तविषयी सबुरीचं धोरण स्वीकारावं अशी विनंती सुनील दत्त यांच्यासोबत आलेल्या दिलीप कुमार यांनी शरद पवारांना केली होती. तेव्हा संजय दत्तविरोधात ठोस पुरावा असून मी कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही असं सांगितल्यामुळे दिलीप कुमार आणि शरद पवार यांच्या मैत्रीत अंतर आलं. परंतु दोघांनी मैत्री कायम ठेवली.
टॅग्स :दिलीप कुमारशरद पवारबाळासाहेब ठाकरेकाँग्रेस