Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चला हवा येऊ द्या'मध्ये आमिर खानची हजेरी

By admin | Updated: March 15, 2017 13:47 IST

पुरस्कार सोहळे किंवा एखाद्या रिअॅलिट शोमध्येही सहसा हजेरी न लावणा-या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान मराठमोठा लाफ्टर शो 'चला हवा येऊ द्या'मध्ये सहभागी झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 15 -  पुरस्कार सोहळे किंवा एखाद्या रिअॅलिट शोमध्येही सहसा हजेरी न लावणा-या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान मराठमोठा लाफ्टर शो 'चला हवा येऊ द्या'मध्ये सहभागी झाला आहे. आमिर व्यतिरिक्त त्याची पत्नी किरण राव आणि सत्यजीत भटकळदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते.   
 
आमिरने 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात हजेरी लावण्याचे कारणही तसंच विशेषच आहे. आमिर आणि सत्यमेव जयतेची टीम राज्यातील दुष्काळ समूळ नष्ट करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करत आहे. पाणी फाऊंडेशनची माहिती मनोरंजन कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वदूर पसरली जावी, यासाठी आमिर 'चला हवा येऊ द्या'मध्ये सहभागी झाला. 
 
मालाडच्या पाठारे वाडीतील स्टुडिओत याचे चित्रण झाले असून गुढीपाडवा विशेष म्हणून या खास भागाचे प्रक्षेपण होणार आहे.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर पाण्याची प्रचंड समस्या आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी पाणी फाऊंडेशन काम करते. किरण राव गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी फाऊंडेशनचे काम पाहात आहे.  
 
आमिर खानने गेल्या वर्षी सत्यमेव जयते 'वॉटर कप' स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेअंतर्गत दुष्काळग्रस्त गावांना पाणी साठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्रातल्या अनेक गावांनी यात सहभाग घेतला होता. 116 गावांनी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास 1 कोटी 367 लाख लीटर पाण्याचा साठा जमा करण्याची क्षमता निर्माण झाली. हेच लक्षात घेता पाणी फाऊंडेशनने एक पाऊल पुढे टाकत आणखी लोकांमध्ये यासंबंधी जन जागृती निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी 8 एप्रिल ते 22 मे रोजी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या पहिल्या गावाला 50 लाखांचे, दुसऱ्या गावाला 30 लाखांचे आणि तिसऱ्या गावाला 20 लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.