रक्ताच्या नात्यापेक्षा सहवासाच्या, अनुभूतीच्या नात्याचे बंध अधिक बळकट असतात. अशाच जपलेल्या अनोख्या बंधाच्या व भावभावनांच्या हृदयस्पर्शी सत्यघटनेवर आधारित मनाला स्पर्शून जाणारी कथा ’परतु’ सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आली असून, आज (शुक्रवारी) हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हॉलीवूडच्या ‘ईस्ट वेस्ट फिल्म्स’ या नामांकित कंपनीने ‘परतु’च्या माध्यमातून एक चांगली कलाकृती रसिकांसाठी आणली आहे. अमेरिका असो की भारत किंवा अन्य कुठला देश असो, सर्वत्र मानवी भावभावना, आपले कुटुंब, आपली माणसं यांच्याविषयीची ओढ सारखीच असते. कळत-नकळत माणुसकीचे आणि नात्यांचे जे अनुबंध निर्माण होतात, त्या अनुबंधाचा वेध निर्माते-दिग्दर्शक आणि या चित्रपटाचे कथालेखक नितीन अडसूळ यांनी चित्रपटातून घेतला आहे. एका मुलाची कथा यात रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाचे कथानक, कलावंत आपल्या मातीतले; परंतु चित्रपटाची निर्मिर्तीमूल्ये, नियोजन व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात आली आहेत.संजय खानझोडे यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून, संकलन प्रसिद्ध संकलक राजेश राव यांनी केले आहे. संगीतकार शशांक पोवार यांनी चित्रपटाला साजेशी संगीताची साथ दिली आहे, तर सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी चित्रपटाचे थीम साँग गायले आहे तसेच ग्रेग सिम्स या हॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत संयोजकाने चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे. या चित्रपटाची कथा क्लार्क मॅकमिलिअन, नितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिली असून, याचं मराठी संवादलेखन मयूर देवल यांनी केलं आहे. चित्रपटाचे निर्माते म्हणून नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रूपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅकमिलिअन हे काम पाहत आहेत. किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री देशमुख, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे अशा दिग्गज कलाकारांच्या परतु सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘परतु’ आज होणार प्रदर्शित
By admin | Updated: December 4, 2015 02:30 IST