Join us

लीड रोलमध्ये प्रथमच पार्थ भालेराव

By admin | Updated: August 1, 2016 02:55 IST

अमिताभ बच्चन यांचा ‘भूतनाथ रिटर्न्स’ चित्रपटात आठवतोय?

अमिताभ बच्चन यांचा ‘भूतनाथ रिटर्न्स’ चित्रपटात आठवतोय? हा तोच चित्रपट, ज्यामध्ये बिग बींसोबत पार्थ भालेरावने रुपेरी पडदा गाजविला होता. या चित्रपटा वेळी ‘पार्थ भालेराव हा हिरो होता आणि मी झिरो!’ असे बोलून प्रत्यक्ष बिग बींनी पार्थच्या अभिनयाचे कौतुक केले होते. त्याच्या या उत्कृष्टअभिनयाने अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व त्याच्या प्रेमात पडले होते. आता हाच पार्थ भालेराव आगामी ‘डिस्को सन्या’ चित्रपटात लीड रोलमध्ये झळकणार आहे. ‘ए शिष्यवृत्ती...’ अशी हाक मारून व मस्तीखोर, खोडकर तितकाच प्रेमळ, काळजी घेणारा बंड्या त्याने ‘किल्ला’ चित्रपटात साकारला होता. ‘खालती डोकं वरती पाय’ सिनेमात पार्थने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्याचे हे सिनेमे कान्स फेस्टिव्हलमध्येदेखील झळकले. पार्थ भालेरावला ‘भूतनाथ रिटर्न्स’ चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारदेखील मिळाला होता. या यशानंतर पार्थ आता ‘डिस्को सन्या’त प्रथमच प्रमुख भूमिकेत दिसेल. या चित्रपटातील त्याचा लुकही खूप वेगळा आहे. आपल्या हटके अंदाजात बिनधास्तपणे ‘कोई शक?’ असा सवाल करीत पार्थ प्रेक्षकांच्या पुढे झळकणार आहे. या चित्रपटात पार्थ रस्त्यावर राहणाऱ्या एका मुलाची भूमिका करीत असून, तो त्याच्या खट्याळ, पण संवेदनशील भूमिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. थ्रिलर व ड्रामाने भरलेल्या आणि त्याला कॉमेडीची जोड असलेल्या ‘डिस्को सन्या’ फिल्मची निर्मिती वकाव् फिल्म्सने केली असून, चित्रपटाचे निर्माते सचिन पुरोहित व अभिजित कवठाळकर हे आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नियाज मुजावर यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट ५ आॅगस्ट रोजी महाराष्ट्रात झळकणार आहे.