Join us

पालकांनो ‘खडूस’ बनू नका!

By admin | Updated: April 17, 2017 04:14 IST

आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे लादून त्यांना नैराश्याच्या गर्तेत ढकलण्यापेक्षा त्यांच्यातील आवड हेरून त्यादृष्टीने त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात रममाण होऊ द्यायला हवे

- सतिश डोंगरे आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे लादून त्यांना नैराश्याच्या गर्तेत ढकलण्यापेक्षा त्यांच्यातील आवड हेरून त्यादृष्टीने त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात रममाण होऊ द्यायला हवे. ‘खडूस’ पालक होण्यापेक्षा आपल्या मुलांच्या मनाचा ठाव घेतल्यास त्यांच्या आनंदात तुम्हालाही सहभागी होता येऊ शकते. असाच सल्ला अभिनेत्री अमृता सुभाष हिने दिला. ‘किल्ला’, ‘श्वास’ यांसारखे दर्जेदार चित्रपट आणि ‘ती फुलराणी’सारख्या नाटकातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री अमृता सुभाष ‘६ गुण’ या चित्रपटात एका खडूस आईच्या भूमिकेत दिसत आहे. पालक आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे लादून त्यांच्यातील नैराश्य वाढीला कसे कारणीभूत ठरत आहेत, याची दर्जेदार कथा या चित्रपटात दाखवली आहे. याच चित्रपटानिमित्त अमृताशी साधलेला संवाद...खडूस आईची भूमिका साकारणं कितपत आव्हानात्मक होतं?- हा प्रश्न जेव्हा मी स्वत:ला विचारते तेव्हा खडूस आई नसावीच असा लगेचच मनातून सूर येतो. वास्तविक आपल्या मुलाबाबत आई कधीच खडूस वागत नसते. परंतु स्पर्धेच्या विचाराने ती मुलाच्या भवितव्याचा विचार करताना कळत-नकळत त्याला नैराश्याच्या गर्तेत सोडते. आपले मूल इतरांपेक्षा वेगळे असावे, शिक्षणात तो अव्वल असावा, त्याने आम्हाला अपेक्षित असलेल्या क्षेत्रातच नावलौकिक मिळवावा अशा एक ना अनेक अपेक्षा पालकांना त्याच्याकडून असतात. अशाच एका सरस्वती सरोदे या आईची भूमिका मी साकारली आहे. मुलाला केवळ सहा गुण कमी मिळाल्याने सरस्वतीचे काही स्वप्न अपुरे राहत असल्याने ती खडूस आई बनते. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती. स्पर्धेमुळे मुलांवर अपेक्षांचे ओझे लादणे हा पालकांमधील की शिक्षण व्यवस्थेतील दोष आहे?- काही देशांमध्ये त्या-त्या क्षेत्रातील पदवी शिक्षणाला प्रचंड महत्त्व दिले जाते. जसे की, एखाद्या विद्यार्थ्याला वाद्यात पदवी घ्यायची असेल तर ते शिक्षण इंजिनिअरिंग-मेडिकलच्या तोडीचे असते. तिथे शैक्षणिक असमानता अजिबात बघावयास मिळत नाही. खरं तर आपल्याकडेही असेच काहीसे आहे; जर एखादा विद्यार्थी कलेत निपुण असेल अन् त्याने सुरुवातीपासूनच त्यादृष्टीने शिक्षण घेऊन पारंगत होण्याचे ठरविले तर तो जीवनात शंभर टक्के यशस्वी होईल. परंतु आपण सुरुवातीपासूनच शिक्षणाने मोजमाप करीत आलो आहोत. इंजिनिअरिंग, मेडिकलला आपण एवढे काही महत्त्व दिले की, विद्यार्थ्यांसमोर दुसरे पर्यायच ठेवलेले नाहीत. त्यामुळे जेव्हा मी याचा विचार करते, तेव्हा मला एक गोष्ट आठवते. ती म्हणजे एका रांगेत माकड, मासा आणि वाघ यांना उभे करून त्यांना झाडावर चढण्यास सांगितले जाते. मात्र माकडाव्यतिरिक्त मासा आणि वाघ यांचा झाडावर चढणे हा गुणधर्म नसल्याने ते त्यात अपयशी होतात. शिक्षणपद्धत अशीच आहे. तुम्ही तुमच्या मुलाला रस असलेल्या क्षेत्रातच करिअर करू द्यायला हवे, असे मला वाटते. निगेटिव्ह भूमिका साकारताना तुला इमेज खराब होण्याची भीती वाटली नाही काय?- हा चित्रपट बघून एक गृहस्थ माझ्याकडे आले अन् त्यांनी मला म्हटले की, तुमच्यासारखीच माझी बायको खडूस असल्याने आता मला माझ्या मुलीविषयी चिंता वाटू लागली आहे. आता तिची परीक्षा सुरू होणार असल्याने तिच्यावर कुठल्याही प्रकारचे दडपण यायला नको, त्यामुळे मी आता काही दिवस रजा टाकणार आहे. वास्तविक ही प्रतिक्रिया मला बरेच काही सांगून जाते. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केल्यास लोक हा चित्रपट बघून निदान परिस्थितीचा विचार करायला लागल्याचे समाधानही वाटत आहे. जेव्हा मला चित्रपटाची कथा सांगण्यात आली तेव्हा ती सद्यस्थितीशी मिळतीजुळती असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले. तेव्हाच मी निगेटिव्ह भूमिकेचा फारसा विचार न करता भूमिका करण्याचा निर्णय घेतला. एकेकाळी तुलाही नैराश्याचा सामना करावा लागला?- होय, माझ्या वडिलांना एक असाध्य असा आजार झाला होता. ते आम्हाला कोणालाही ओळखत नसत. जेव्हा आपला जिवाभावाचा माणूस आपल्याला ओळखत नसतो, तेव्हा त्याचा मनावर आघात होतो. कालांतराने याचेच मला नैराश्य येत गेले. मात्र यादरम्यान मला विजय तेंडुलकर नावाची व्यक्ती भेटली. त्यांनी मला मानसोपचाराचे महत्त्व पटवून देत मानसिक धीर दिला. बऱ्याचदा आपण एखाद्या आजारावर औषध घेतो; परंतु मनाच्या आजारात मानसिक धीर हाच रामबाण उपाय आहे. अन्यथा मनातील दु:ख आपल्या जवळच्या माणसावर उतू जातात. जसे की, नवऱ्यावर-मुलांवर राग व्यक्त करणे. मात्र मला ही सामाजिक हिंसा वाटते. त्यामुळे मानसोपचाराचे महत्त्व सगळ्यांनीच ओळखायला हवे. सध्या माझे पती संदेश कुलकर्णी याच विषयावर अभ्यास करीत आहेत. तुला वाचनाची प्रचंड आवड आहे; सध्या तू कोणत्या पुस्तकाचे वाचन करीत आहेस?- मानसोपचार याच विषयाच्या अनुषंगाने मी सध्या ‘गर्ल इण्ट्रप्टेड’ हे पुस्तक वाचत आहे. हे पुस्तक मनोरुग्णालयातून परतलेल्या सुझान नावाच्या मुलीने लिहिले आहे. या पुस्तकातून मी अनेक मानसिक रु ग्णांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करते आहे. आपण शारीरिक आरोग्यावर लक्ष देतो, पण मानसिक आजाराकडे बहुतेकदा दुर्लक्ष करतो. पण, मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करणे ही खूप गंभीर बाब आहे. बऱ्याचदा आपल्या मानसिक आजार म्हणजे वेडेपणा असा आपल्याकडे समज आहे. प्रत्यक्षात असे काहीच नसून, मानसिक आजार ही आपल्या देशापुढील एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य या विषयाकडे गंभीरपणे विचार करायला हवे. ‘कासव’मध्ये ते दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.