Join us

'चेकअपला जातो सांगून गेले ते परत आलेच नाहीत', लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीत नीलम शिर्के भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 09:43 IST

'पछाडलेला' फेम नीलम शिर्केने सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची भावुक आठवण (neelam shirke, laxmikant berde)

'असंभव', 'पछाडलेला' या सिनेमा - मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नीलम शिर्के. नीलम सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. तिने पछाडलेला सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केलं. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत नीलमने लक्ष्मीकांत यांच्याविषयीची भावुक आठवण सांगितली. नीलम म्हणाली की,"पछाडलेलामध्ये लक्ष्मामामांसोबत छान ट्यूनिंग झालं. ते सीनियर जरी असले आमचे तरी आम्हाला चाचपडून बघायचे की चांगले आर्टिस्ट आहेत की नाही की, उगाचच यंगस्टर्स म्हणून उचलून आणले आहेत."

नीलमने सांगितली 'लक्ष्या'विषयीची भावुक आठवण

नीलम पुढे म्हणाली की, "पछाडलेलानंतर आम्ही एकत्र नाटक करायचं ठरवलं. कुमार सोहोनी दिग्दर्शक होते नाटकाचे. मी बबन प्रामाणिक असं नाटकाचं नाव होतं. या नाटकात मी, लक्ष्मामामा, प्रसाद ओक आणि बाकी सगळी टीम होती. आम्ही त्याच्या रिहर्सल सुरु केल्या. लक्ष्यामामा आम्हाला खूप मार्गदर्शन करायचे. त्यावेळी इथे नको उभी राहू, असं कर, तसं कर.. असं लक्ष्यामामा आम्हाला सांगायचा. त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव होता. त्या नाटकाचे ते सुपरस्टार होते. आम्ही त्यावेळी मालिका वगैरे करायचो पण एवढं नाव नव्हतं."

"एक दिवस लक्ष्यमामा रिहर्सलला आले आणि म्हणाले, मी थोडासा आराम करतो.. मला बरं वाटत नाहीये.. तासभर रिहर्सल केली असेल त्यानंतर ते कुमार सोहोनींना सांगून आराम करायला घरी गेले. दुसऱ्या दिवशीही आले आणि त्यांनी कुमार सोहोनींना खालूनच फोन लावला. मी जरा चेकअप करुन येतो, मला कालपासून बरं वाटत नाहीये, असं ते म्हणाले. त्यावेळी ते जे चेकअप करायला गेले त्यानंतर आम्हाला कधीच भेटले नाहीत. त्यावेळी आम्ही लास्ट टाइम लक्ष्यामामाला बघितलं."

"बालपणीच्या स्टेजपासून आम्ही त्यांना बघत आलोय त्यानंतर त्यांच्यासोबत काम करणं हा खूप छान अनुभव होता. आणि अचानक कळते की लक्ष्यामामा नाहीत.आम्ही रिहर्सल करतोय. ते चेकअपला गेलेत. ४ दिवसांनी परत येतील आणि १५ दिवसांनी आमचं नाटक ओपन होणार, ही खूप साधी गोष्ट होती. आणि अचानक... लक्ष्यामामा नाहीत हा फार मोठा धक्का होता.." अशाप्रकारे नीलमने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयीची भावुक आठवण सर्वांना सांगितली.

 

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेमराठी चित्रपट