Join us

केवळ स्टंटबाजीचा चकचकाट!

By admin | Updated: February 20, 2016 02:14 IST

चित्रपटाचा नायक शिवरायभक्त आहे म्हटल्यावर जे चित्र डोळ्यांसमोर येईल, तसे ते नसावे हे विशेष म्हणावे लागेल. आता हेच बघा नाङ्घ ‘मि. अँड मिसेस सदाचारी’

चित्रपटाचा नायक शिवरायभक्त आहे म्हटल्यावर जे चित्र डोळ्यांसमोर येईल, तसे ते नसावे हे विशेष म्हणावे लागेल. आता हेच बघा नाङ्घ ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातल्या नायकाच्या अंगात शिवाजी महाराज भिनलेले आहेत; म्हणजे हा नायक तसे पडद्यावर सुरुवातीपासून दाखवत राहतो. पण त्याचे आचरण मात्र त्याच्या या भूमिकेशी मेळ खात नाही. बरं, एवढेच करून हा नायक म्हणजे ‘मिस्टर सदाचारी’ थांबत नाही; तर तो प्रचंड स्टंटबाजीही करतो आणि प्रेमप्रकरणातही अडकतो. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर घातलेला या चित्रपटाचा पसारा मात्र केवळ चकचकाटापुरताच उरतो. चित्रपटाची कथा काय तर, शिवा आणि जीवा असे दोन भाऊ असतात. यातला जीवा हा त्याच्या आईवडिलांचा लाडका असतो, कारण तो अभ्यासात हुशार वगैरे असतो शिवाचे मात्र अगदी या उलट असते. शिवा हा टपोरीगिरी करणारा, पण तो अडीअडचणीला इतरांच्या मदतीला धावून जाणारा असतो. तो गार्गी नामक तरुणीच्या प्रेमात पडतो. ती नेमकी त्याच्या जिगरी दोस्ताची बहीण निघते आणि मैत्रीत कटुता निर्माण होते. असे का, हा प्रश्न पडतो.कट टूङ्घ- दुसरा सीन शिवाच्या वडिलांनी शिवाचे एकूणच थेर बघून त्याला ओवाळूनच टाकलेले असते. पण पुढे घटना अशा काही घडत जातात, की पिता-पुत्रामध्ये जवळीक निर्माण होते. आयुष्यावर परिणाम करणारा हा एवढा मोठा बदल अचानक कसा काय होतो, हेही विचारायचे नाही बरं का ! कट टू - तिसरा सीन शिवा आणि गार्गीचे प्रेम ऐन भरात आलेले असताना काही कारणाने वादाचे प्रसंग उद्भवतात आणि या प्रेमाला गालबोट लागते. पुढे ही कथा कुठे फिरत जाते हेसुद्धा विचारायचे नाही. तुकड्या तुकड्यांत झालेली कथेची विभागणी, विस्कळीत पटकथा, अनपेक्षित प्रसंगांची पेरणी याने हा चित्रपट रंगला आहे. प्रवीण तरडे यांची पटकथा व संवाद तसेच आशिष वाघ यांचे दिग्दर्शन, ही भट्टी या चित्रपटाला फारशी तारून नेत नाही. मग यात आहे तरी काय, तर ते म्हणजे शिवाच्या भूमिकेत वैभव तत्त्ववादी याने केलेली स्टंटबाजी! त्याचा हा डॅशिंग अवतार म्हणजे त्याने स्वत:मध्ये केलेला मोठा बदल असून, त्याची वेगळी इमेज ठसवणारा आहे. त्यादृष्टीने त्याने घेतलेली मेहनत चित्रपटात दिसते. परंतु त्याच्या या मेहनतीला पटकथेची जोड मिळाली असती, तर त्याचा हा अवतार अधिक दमदारपणे ठसला असता. यात प्रार्थना बेहेरेने गार्गी रंगवली आहे; मात्र तिला यात फार काही वेगळे करण्यासारखे नसल्याने तिने आतापर्यंत रंगवलेल्या भूमिकांचे ते केवळ पुढचे पाऊल ठरते. वडिलांच्या भूमिकेत मात्र मोहन जोशी त्यांचे अस्तित्व चोख दाखवून देतात. प्रदीप वेलणकर, उमा सरदेशमुख, विजय आंदळकर, उदय नेने, सुमुखी पेंडसे, प्रसाद जावडे आदी कलाकारांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका नीट रंगवल्या आहेत.कथेच्या अनुषंगाने चित्रपटात गाणी कधी यावीत याचे प्रयोजनही यात चुकले आहे. यातल्या गाण्यांसाठी काळ, वेळ वगैरेचे गणित नाही. त्यामुळे ती चित्रपटाचा भागही वाटत नाहीत. मात्र वेगळा स्वतंत्र विचार करता यातले ‘जगदंब’ हे गाणे तसेच चित्रपटाचे शीर्षकगीत चांगले झाले आहे. यातली मॉरिशसची लोकेशन्स नयनरम्य आहेत, पण मुळात मॉरिशसची कथेत गरजच नाहीय. असो. फक्त आणि फक्त स्टंटबाजीची आवड असणाऱ्यांची, तसेच काही काळ डोळे सुखावून ठेवण्याची सोय तेवढी या ‘सदाचारी’ने केली आहे.