Join us

मोजकेच मराठी चित्रपट यशस्वी होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 01:42 IST

आजच्या चित्रपटांच्या तुलनेत आमच्या काळाचा सिनेमा चांगला होता भले तो सिनेमा ब्लॅकव्हाइट असला तरी. त्या वेळी चित्रपटांचे सुंदर व सशक्त विषयदेखील होते.

आजच्या चित्रपटांच्या तुलनेत आमच्या काळाचा सिनेमा चांगला होता भले तो सिनेमा ब्लॅकव्हाइट असला तरी. त्या वेळी चित्रपटांचे सुंदर व सशक्त विषयदेखील होते. तसंच त्या वेळी व्ही. शांताराम, राजा परांजपे यांचे चित्रपट पाहून मला कधी कधी असं वाटत होतं की, त्या काळी जन्माला आलं पाहिजे होतं. कारण ते चित्रपटदेखील नावीन्य व वैविध्यपूर्ण होते. या दिग्गज कलाकारांनंतर होणारे चित्रपट हे अडकून राहिले. जसे की, लावणी, तमाशामध्ये त्या वेळचे सिनेमे पूर्ण अडकून राहिले होते. यानंतर पूर्ण कॉमेडीची लाट आली. यामध्येदेखील चित्रपट काही वर्षं पूर्णपणे अडकून राहिले. यापाठोपाठ माहेरची साडी हा चित्रपट आला. यामध्ये तर दहा वर्षं चित्रपट अडकून राहिला. म्हणून अशा एकाच पद्धतीचे चित्रपट एकापाठोपाठ येत राहिले. पण आधी काळ असा असला तरी लोक काळाच्या पुढे होते. जसे की, व्ही. शांताराम यांचे खूप चित्रपट काळाच्या पुढे होते. तसेच राजा परांजपे यांच्या कित्येक चित्रपटांमध्ये त्या वेळी जी व्हरायटी होती ती खरंच मानली पाहिजे. पण आता असे काही विविध विषयांचे चित्रपट पाहायला मिळत नाही असं वाटतं. तेच चित्रपट किवा साऊथचे कॉपी करतात का असंदेखील वाटतं.आता पुन्हा प्रेक्षक वेगवेगळ्या सिनेमांकडे वळतो. फॅन्ड्री म्हणा, नटरंग म्हणा किंवा लय भारी चित्रपट हे मसालेदार होते म्हणून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या अशा चित्रपटांनंतर पुन्हा प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे वळू लागला. त्यामुळे ही एक जमेची बाजू आहे. पण तरीही बोटावर मोजता येतील इतकेच चित्रपट यशस्वी होतात. जर मराठी चित्रपटांना व्यावसायिक रूप दिले तरच ते यश मिळवू शकतात. पण चित्रपट उभारणीसाठी स्वतंत्र प्रोड्यूसर तसा उभा राहू शकत नाही. कारण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रोड्यूसर एवढे पाच-सहा कोटी पब्लिसिटीला लावणार, मग तो प्रेक्षकांपर्यंत जाणार, तेवढे शक्य नाही. भले आजचे चित्रपट शिखरापर्यंत पोहोचतात, त्यांना पुरस्कारदेखील प्राप्त होतात. तरीही मराठी चित्रपटांचा रेशो काढला तर शंभरपैकी दहाच चित्रपट हिट होतात. बाकीचे नव्वद टक्केचित्रपट आलेले-गेलेलेदेखील कळत नाही.प्रोड्यूसर प्रॉडक्शन करतो पण मार्केटिंगही करतो. पण आताची ही गणितं इतकी वाढली, की ती एकट्या प्रोड्यूसरला जमत नाहीत. तसेच काही जण डोळ्यांसमोर सबसिडी, सॅटेलाइट राइट्स असं धरूनच येतात. चला, एवढंच आपल्याला मिळेल जर चित्रपट चालला. पण आता हे चित्र बदलायला पाहिजे. सगळ्या प्रोड्यूसरमध्ये कुठे तरी व्यवस्थित प्रमोशनसाठी, मार्केटिंगसाठी एकी असणे गरजेचे आहे असं वाटतं. सध्या चार प्रोड्यूसर एकत्र येणे या फक्त बोलण्याच्या गोष्टी झाल्या. प्रॅक्टिकली तर काहीच होत नाही.आता एवढे प्रमोशनचे फंडे पाहिले असता, माहेरची साडीचे मार्केटिंग आठवते. या यशस्वी चित्रपटाचे क्रेडिट पूर्णत: विजय कोंडकेंना देईन. कारण मार्केटिंगमध्ये किवा डिस्ट्रिब्युशनमध्ये त्यांचा हातखंडाच होता. आधी माहेरची साडी हा चित्रपट त्यांनी तीन थिएटरला लावला. मग त्यापुढे तो दहा थिएटरला गेला. मग हळूहळू हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रभर धोधो चालला. तसेच आजच्या चित्रपटांसारखे चार आठवडे बुकिंगदेखील नव्हते. पण तो चालू नये आणि चालल्यानंतर न थांबणे हे यश विजय कोंडकेंचेच म्हणावे लागेल. ११८ आठवडे हा चित्रपट पुण्यात चालला. त्या वेळी तिकिटे ही तीन ते पाच रुपये अशी होती. म्हणजे त्या काळी बॉक्स आॅफिसवर मिळविलेला बारा-तेरा कोटी पैसा. हा आकडा आता फक्त चित्रपटांच्या मार्केटिंगला घालावा लागतो. आताची जर प्रमोशन बिलं मोजली तर ती पाच-सहा कोटींची नुसती प्रमोशनची बिलं असतात. चित्रपटांची गणितं व्यावसायिकरीत्या बदलली आहेत. जर एखादा चित्रपट केलाच तर एक कोटी फिल्मसाठी लावला व चार कोटी प्रमोशनसाठी लावला तर मला याचीही खात्री नाही, की प्रेक्षक तो चित्रपट पाहायला थिएटरपर्यंत पोहोचेल.> विसाव्या वर्षी तिने मायानगरीत प्रवेश केला. आज मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करून तीस ते पस्तीस वर्षे पूर्ण झाली असतील तरी ही सुंदर अभिनेत्री या इंडस्ट्रीवर राज्य करीत आहे. १९९१ च्या काळात कोणत्याही प्रकारचा प्रमोशन फंडासारख्या गोष्टी नसतानादेखील ११८ आठवडे त्यांचा माहेरची साडी हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर कल्ला करीत होता. चित्रपटाच्या नावावरून लक्षात आलंच असेल ही अभिनेत्री आहे अलका कुबल-आठल्ये. या अभिनेत्रीने मराठी इंडस्ट्रीला ‘वहिनीची माया’, ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘शुभ बोल नाऱ्या’, ‘लपवाछपवी’, ‘नातीगोती’ असे अनेक चित्रपट दिले आहेत. अशा या तगड्या अभिनेत्रीचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला सेलीब्रिटी रिपोर्ट.