Join us
Daily Top 2Weekly Top 5

बायकोसाठी वाट्टेल ते! पत्नीच्या वाढदिवसासाठी पठ्ठ्याने ठेवला थेट गौतमीचा डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 12:27 IST

Gautami patil: बीडच्या एका पठ्ठ्याने आपल्या बायकोच्या वाढदिवशी थेट गौतमीचा डान्स ठेवला.

गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव आता महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन राहिलेलं नाही. आपल्या हटके लावणीसाठी ओळखली जाणारी गौतमी गेल्या काही दिवसांपासू सातत्याने चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे येत्या काळात गौतमीची क्रेझ तुफान वाढली असून तिला अनेक लहानमोठ्या कार्यक्रमांची सुपारी मिळत आहे. यामध्येच बीडच्या एका पठ्ठ्याने आपल्या बायकोच्या वाढदिवशी थेट गौतमीचा डान्स ठेवला.

सध्या सोशल मीडियावर बीडमधील एका व्यक्तीची चर्चा रंगली आहे. या व्यक्तीने बायकोला खूश करण्यासाठी तिच्या वाढदिवशी थेट गौतमीच्या लावणीचं आयोजन केलं. विशेष म्हणजे खास गौतमीला पाहण्यासाठी बीडकरांनी तोबा गर्दी केली होती.

आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील किरण गावडे यांची पत्नी प्रगती गावडे यांच्या वाढदिवसासाठी गौतमीला बोलावण्यात आलं होतं. या वाढदिवसासाठी भाजप आमदार सुरेश धस यांनीही हजेरी लावली होती. विशेष म्हणजे एका महिलेच्या वाढदिवसासाठी गौतमीचा शो होणं हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

दरम्यान, या पठ्ठ्याने आपल्या बायकोच्या वाढदिवसासाठी आणलेला केक सुद्धा गौतमीच्याच हस्ते कापला. त्यानंतर गौतमीने प्रगती यांना केक भरवला. या कार्यक्रमानंतर गौतमीने तिची लावणी सादर केली. त्यामुळे हा वाढदिवस आणखीनच चर्चेत आला. मध्यंतरी गौतमीच्या लावणीवरुन मोठा वादंग माजला होता. अश्लील हावभाव आणि हातवारे केल्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. त्यानंतर तिने सर्वांची जाहीरपणे माफी मागितली होती. गौतमी लावणी डान्सर असण्यासोबत तिने दोन म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :गौतमी पाटीलसेलिब्रिटीबीड